प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज - आमदार राजेंद्र पाटणी






·         ३१ वा रस्ता सुरक्षा सप्ताह
·         जनजागृतीसाठी सेल्फी पॉईंट, बाईक रॅली
·         ‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य
वाशिम, दि. १४ : प्रत्येक वाहनधारकाचा प्रवास सुरक्षित व सुकर होण्यासाठीच वाहतूक विषयक नियम व कायदे बनविले गेले आहेत. या नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्त्यव्य आहे. वाहतूक नियमांच्या पालनाची सुरुवात प्रत्येकाने आपल्या कुटुंबापासून करावी, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले. वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित ३१ रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटणी म्हणाले, वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड करण्याची तरतूद आहे. दंडाची रक्कम वसूल करणे हा त्यामागील उद्देश नसून या दंडामुळे नागरिकांना वाहतूक नियमाचे पालन करण्याची सवय लागावी, हा उद्देश आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाकडून दंड वसूल केला गेला पाहिजे. दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे, वेग मर्यादित ठेवणे, मोबाईलवर न बोलणे यासारख्या नियमांकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र यामुळे होणाऱ्या अपघातांमुळे आपल्याला फार मोठी किंमत चुकवावी लागू शकते. तसेच आपल्या वाहनांचा विमा काढणे व इतर आवश्यक तपासण्या वेळेवर करण्याची सुद्धा आवश्यकता असून याबाबत सर्व वाहनधारकांनी जागरूक रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, रस्ता सुरक्षा हा अतिशय महत्वाचा विषय आहे, त्यामुळे याविषयी जनजागृतीसाठी रस्ता सुरक्षा सप्ताह देशभर राबविला जात आहे. अतिशय क्षुल्लक कारणांसाठी वाहतूक नियम तोडून वेगाने वाहने चालविणे, सिग्नल तोडणे यासारखे प्रकार केले जातात. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होणारे अपघात अनेकदा आपल्या व इतरांच्याही जीवावर बेतू शकतात. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी जिल्हा सुरक्षा समितीमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी सुद्धा वाहतूक नियमांचे पालन करून रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच यापुढे वाहतूक नियमांचे पालन न करण्यास पोलीस विभाग व परिवहन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, रस्त्यावर वाहन चालवताना होणारी एक चूक वाहनधारकाच्या जीवावर बेतते. त्यामुळे रस्ता सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. अपघातामध्ये जखमींना वेळेवर मदत न मिळाल्याने त्यांचा जीव जातो. त्यामुळे रस्ते अपघातात जखमीला त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. अपघातातील जखमीला मदत केल्यामुळे पोलिसांकडून तुम्हाला कोणताही त्रास दिला जात नाही. वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या, तसेच रस्त्यावरील इतरांचीही काळजी घ्या, असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी केले. यावेळी त्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या आयोजनाचा हेतू सांगितला. तसेच ११ ते १७ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. हेल्मेटचे महत्व पटवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीला यावेळी उपस्थितांनी हिरवी झेंडी दाखविली. बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी रस्ता सुरक्षा विषयी पथनाट्य सादर करून वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली. कार्यक्रमाला विद्यार्थी, वाहनधारक, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे