जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर - पालकमंत्री शंभूराज देसाई







    वाशिम येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
·            पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
वाशिम, दि. २६ : जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि समतोल विकासासाठी पायाभूत सुविधा, सिंचन, ग्रामीण रस्ते, आरोग्य सुविधा निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विकास कामांसाठी शासनाकडून अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासन यांना सोबत घेवून प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. पोलीस कवायत मैदान येथे आज प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, नगराध्यक्ष अशोक हेडा, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक, पत्रकार बांधव, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, राज्यातील सरकार जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवीत आहे. वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. स्वराज्याची राजधानी रायगडच्या संवर्धनासाठी सरकाने वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची वाढविण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेण्यात आला आहे. परळ येथील बीआयटी चाळीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणारे घर आणि घाटकोपर येथील चिराग नगर मधील अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य असणाऱ्या घराच्या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाणार आहे.
प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री  सचिवालय कक्षस्थापन करण्यात आले आहेत. सर्वसामान्य माणसाचे दैनंदिन आणि स्थानिक प्रश्न या कक्षाच्या माध्यमातून सोडविले जाणार आहेत. त्यांना आपले गाव, शहर सोडून मुंबईला येण्याची आवश्यकता भासणार नाही. यामुळे सर्वसामन्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
बळीराजाच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभे आहे. बळीराजाला चिंतामुक्त करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. त्यानुसार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे. जिल्ह्यातील सुमारे १ लाख ९ हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. त्यांना सुमारे ७७७ कोटी २३ लक्ष रुपयांची कर्जमुक्ती मिळणार आहे. शेतीमधील उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिकतेची जोड दिली जात आहे. राज्यात कृषि उत्पादनावर आधारित लघु अन्न प्रक्रिया उद्योगांचे मिनी फूड पार्कउभारण्यात येणार आहेत, असे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले.
गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अवेळी पावसाने शेतपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने १७९ कोटी ९९ लक्ष रुपये मदत वितरीत केली आहे. २ लक्ष २० हजार ९८४ शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप झाले आहे. जिल्ह्यातील सर्व ७९३ गावांमध्ये शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट देण्यात आली आहे. शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ केले असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी भागभांडवल म्हणून सरकारने साडे तीन हजार कोटी रुपये अतिरिक्त निधी दिला आहे. या महामार्गाचा सुमारे ९७ किलोमीटरचा टप्पा जिल्ह्यातून जातो. शेतमालाच्या वाहतुकीसाठी, दळणवळणासाठी ग्रामीण रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामार्फत विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
साखरा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेसाठी प्रथम टप्प्यात २ कोटी ५० लक्ष रुपये निधी प्राप्त झाला असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगतिले. सर्व शाळांमध्ये सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांचेउपक्रम सुरु होत आहे. दररोज परिपाठाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील मुलतत्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये याविषयी माहिती मिळणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा क्रीडा संकुल येथील सुसज्ज जलतरण तलावाचे लोकार्पण नुकतेच आहे. या तलावामुळे जिल्ह्यात जलतरणपटू घडण्यास मदत होईल, असे पालकमंत्री म्हणाले. स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये घरोघरी जावून ओला व सुका कचरा संकलित केला जात आहे. या कचऱ्याचे विलगीकरण प्रक्रिया सुरु आहे. कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनाचा राज्यस्तरीय आराखडा तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात शिव भोजन योजनेचा सुरु करण्यात आली असून कामानिमित्त शहरात येणाऱ्या गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यांनी  सांगितले. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेताना पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच शेतकरी, कामगार, रोजीरोटी कमावणारा मजूर आनंदी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री श्री. देसाई यांनी परेड निरीक्षण केले. वाशिम पोलीस दलाचे पुरुष व महिला पथक, होमगार्ड पुरुष व महिला दल, बाकलीवाल विद्यालायचे एनसीसी पथक, यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळेचे विद्यार्थी, नवोदय विद्यालयाचे स्काऊट पथक, पोलीस बँण्ड पथक तसेच शिघ्र कृती दल, नगरपरिषदेचे अग्निशमन दल आदींनी मानवंदना दिली. यावेळी नवोदय विद्यालयाच्या पथकांनी देशाच्या एकात्मतेचे, संस्कृतीचे दर्शन घडवणारे पथसंचलन केले.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी, माजी सैनिक व नागरिकांना भेटून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी नवोदय विद्यालयच्या विद्यार्थ्यांनी मानवी पिरॅमिड व मे पोल ड्रील, बाकलीवाल विद्यालायाच्या विद्यार्थ्यांनी पुलवा हल्ल्यावर आधारित कार्यक्रम व सुशीलाताई जाधव विद्यालयाच्या विद्यार्थांनी लेझीम नृत्य सादर केले. या कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे पालकमंत्र्यांनी कौतुक करून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शिरसाट यांनी केले.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, शिक्षणाधिकारी माध्यमिक तानाजी नरळे, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे