पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस द्या - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
· १९ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
· १ लक्ष १९ हजार बालकांना दिली जाणार लस
· ९५० पल्स पोलिओ बूथ, ३१ मोबाईल टीमची स्थापना
वाशिम, दि. ०८ : जिल्ह्यात १९ जेन्वारी २०२० रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील ५ वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस द्यावी. या मोहिमेतून एकही बालक सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. संदीप हेडाऊ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मेहकरकर, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. एस. व्ही. देशपांडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अश्विन हाके, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, युनिसेफचे सल्लागार डॉ. शैलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेही प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आरोग्य विभागाने इतर विभागांशी समन्वय साधून नियोजन करावे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र बालकाला पोलिओची लस मिळण्यासाठी सूक्ष्म नियोजन होणे आवश्यक आहे. तसेच झोपडपट्टी, मंजुरांच्या वस्त्या अशा ठिकाणी असलेल्या बालकांना लस देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तसेच प्रवासातील बालकांना लस देण्यासाठी ट्रान्सिट टीम नेमण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी मोहिमेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीविषयी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातील १ लक्ष १९ हजार ४७२ बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे. याकरिता ९५० लसीकरण बूथ, ३१ मोबाईल टीम व १३१ ट्रान्सिट टीम तयार करण्यात येतील. रेल्वे स्थानक, बसस्थानक, बसथांबे, चौफुली आदी ठिकाणी या ट्रान्सिट टीम कार्यरत राहणार आहेत. २१ ते २३ जानेवारी दरम्यान ग्रामीण भागात व २१ ते २५ जानेवारी दरम्यान शहरी भागात घरोघरी जावून मोहिमेतून सुटलेल्या बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. आहेर यांनी यावेळी दिली.
*****
Comments
Post a Comment