वाशिम जिल्ह्यात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम



·         जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज
·         ९५० लसीकरण बूथ; ३१ मोबाईल टिम तैनात
वाशिम, दि. १६ : जिल्ह्यात रविवार, १९ जानेवारी २०२० रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सुमारे १ लक्ष १९ हजार ४७२ बालकांना यादिवशी पोलिओची लस देण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा आरोग्य यंत्रणेने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.
लसीकरण मोहिमेसाठी शहरी भागातील १२४ व ग्रामीण भागातील ८२६ अशा एकूण ९५० बुथवर २ हजार ५१७ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागात १७१ व शहरी भागात २५ असे एकूण १९६ पर्यवेक्षक या मोहिमेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहेत. वीट भट्ट्या, गिट्टी खदान, मजुरांच्या वस्त्यांमधील बालकांना लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात २३ व शहरी भागात ८ अशा एकूण ३१ मोबाईल टीम कार्यरत राहणार आहेत. प्रवासातील बालकांना लसीकरण करण्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्थानक, बस थांबे, चौफुलीच्या ठिकाणी १३१ ट्रान्सिट टीम दोन पाळीमध्ये कार्यरत राहणार आहेत.
ग्रामीण भागामध्ये २१ ते २३ जानेवारी दरम्यान आणि शहरी भागामध्ये २१ ते २५ जानेवारी दरम्यान घरोघरी जावून सर्वेक्षण करून बुथवर न आलेल्या बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. याकरिता ग्रामीण भागात १२३६ तर शहरी भागात ८१ असे एकूण १ हजार ३१७ चमू कार्यरत राहणार आहेत. मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहा तालुक्यासाठी सहा खातेप्रमुख नियुक्त केले आहेत. तसेच गट विकास अधिकारी यांना प्रत्येक गावासाठी एक कर्मचारी नियुक्त करून मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना १९ जानेवारी रोजी पोलिओ लसीकरण करून मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे