राष्ट्रीय वयोश्री योजनेतून दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सहाय्यक साधने
· १९ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
· ई-मेलद्वारे सुद्धा सादर करता येणार अर्ज
वाशिम, दि. ०८ : राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साधनांचे अलिमको संस्थेमार्फत वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांनी ९ जानेवारी ते १९ जानेवारी २०२० या कालावधीत अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. प्रत्येक पंचायत समिती कार्यालये, नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयांमधील मदत कक्षात हे अर्ज स्वीकारले जातील. तसेच bplsrcitizen@gmail.com या ई-मेल पत्त्यावरही आपले अर्ज पाठविता येतील, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
साध्या कागदावर सुद्धा हा अर्ज करता येईल. या अर्जामध्ये ज्येष्ठ नागरिकाचे संपूर्ण नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, वय, आवश्यक असलेले सहाय्यक साधन याविषयीची माहिती नमूद करावी. तसेच अर्जासोबत आधार कार्ड व दारिद्र्य रेषा प्रमाणपत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार कानाची मशीन, चष्मे, कुबडी, दातांची कवळी, कुबडी, तीन बेस काठी, अंधकाठी, वॉकर, कमोड खुर्ची, तीन चाकी सायकल, घरातील व्हीलचेअर इत्यादी प्रमाणे सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*****
Comments
Post a Comment