मतदान पथके रवाना; आज मतदान




जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक

वाशिम, दि. ०६ : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत सहा पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक २०१९ करीता जिल्ह्यात आज, ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. या कालावधीत मतदान होत आहे. याकरिता सर्व ८५२ मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेली पथके मतदान साहित्यासह रवाना झाली. तसेच सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३ लक्ष ५४ हजार ४८० महिला, ३ लक्ष ९० हजार ५८७ पुरुष व ९ इतर असे एकूण ७ लक्ष ४५ हजार ७६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जिल्हा परिषदेचे ५२ गट व सहा पंचायत समिती अंतर्गत १०४ गणांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील १५४, मालेगाव तालुक्यातील १४१, रिसोड तालुक्यातील १४९, मंगरूळपीर तालुक्यातील १३४, मानोरा तालुक्यातील १३९ आणि कारंजा तालुक्यातील १३५ अशा एकूण ८५२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याकरिता ८५२ मतदान केंद्राध्यक्ष, २५५६ मतदान अधिकारी व ८५२ शिपाई असे एकूण ४२६० अधिकारी, कर्मचाऱ्यांची पथके मतदान यंत्रे व आवश्यक साहित्यासह रवाना झाली आहेत. तसेच ५०७ अधिकारी, कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.
सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांतता व भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ८५२ मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, २५ पोलीस निरीक्षक, ७१ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १२६२ पोलीस कर्मचारी, ९०० पुरुष-महिला होमगार्ड यांच्यासह बुलडाणा जिल्ह्यातील ३ पोलीस उपाधीक्षक, १० पोलीस निरीक्षक, २० सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ३०० पोलीस कर्मचारी तसेच हिंगोली व बुलडाणा जिल्ह्यातील होमगार्ड यांचा समावेश आहे. ५४१ गुन्हेगारांवर वेगवेगळ्या कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
मतदान प्रक्रिया व मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मतदान केंद्रांवर मतदानाचे दिवशी ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तसेच ८ जानेवारी २०२० रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या मतमोजणीच्या ठिकाणी मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत फौजदारी दंड संहिता १९७३ चे कलम १४४ प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वाशिम यांनी लागू केले आहेत.
निर्भयपणे मतदान करा : जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततामय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडून निर्भयपणे, कोणत्याही दबावाला व अमिषाला बळी न पडता आपला अधिकार बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे