वाशिम जिल्ह्यात ७ जानेवारी रोजी स्थानिक सुट्टी जाहीर
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक
वाशिम, दि. ०४ : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ६ पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ जानेवारी २०२० रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२० रोजीच्या शासन परिपत्रकानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून निवडणूक कार्यक्रम लागू असलेल्या क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये व इतर कार्यालये तसेच खासगी कंपन्या, कारखाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनावरील कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मंगळवार, ७ जानेवारी २०२० रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
१ जानेवारी रोजीच्या शासन परिपत्रकानुसार मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या खासगी कंपन्या, कारखाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनावरील कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस पगारी सुट्टी देण्यात यावी, असे म्हटले आहे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल, असे नमूद केले आहे.
*****
Comments
Post a Comment