समाज माध्यमे वापरताना सतर्कता बाळगा - पोलीस अधीक्षक वसंत परदेशी




‘सायबर सेफ वुमेन’ मोहीम

वाशिम, दि. ०३ : आजचं युग हे सायबरचे युग आहे. समाज माध्यमांचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. प्रत्येकाला आपला परिवार हा सुरक्षित असला पाहिजे, असे वाटते. त्याचप्रमाणे समाज माध्यमे हाताळताना देखील प्रत्येकाने सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले. आज ३ जानेवारी रोजी हॅपी फेसेस स्कूलच्या श्रीमती यमुनादेवी हेडा सभागृहात पोलीस विभागाच्यावतीने आयोजित ‘सायबर सेफ वुमेन’ मोहिमेंतर्गत कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बन्सोड, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक मृदुला लाड, हॅपी फेसेसचे संचालक दिलीप हेडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. परदेशी म्हणाले, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सायबर युगात अनेक आव्हाने आपल्या समोर आहेत, दिवसेंदिवस ही आव्हाने वाढत आहेत. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र सायबर अंतर्गत सायबर सेल कार्यान्वित आहे. महिला या गुन्ह्यांमध्ये सॉफ्ट टार्गेट ठरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सायबर युगात वावरताना, समाज माध्यमांचा वापर करताना महिलांनी विशेष काळजी घ्यावी. सायबर युगात डेटा ही संपत्ती बनली आहे, अनेकांकडून याबाबतीत फसवणूक होत आहे. प्रत्येकाने सावध राहून सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

मोबाईलमुळे माणूस जगेल की मरेल, अशी स्थिती आज झाली आहे, असे सांगून श्री. परदेशी म्हणाले, मोबाईल हा आज जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्याचा वापर काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः डिजिटल तंत्रज्ञानाशी येणारा आपला संबंध या माध्यमातून इंटरनेट बँकिंग, ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन गेम्स, समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सायबर गुन्ह्याद्वारे फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे सायबर सुरक्षेची गरज आज निर्माण झाली आहे. यावेळी त्यांनी सायबर गुन्ह्यांचे प्रकार, या गुन्ह्यापासून बचाव होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय याविषयी माहिती दिली. विविध प्रकारचे आमिष दाखवून होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. आई-वडील हे आपले कायमचे उत्तम मित्र आहेत, त्यांच्याजवळच आपल्या समस्या, विचारांची आदान-प्रदान केली पाहिजे. मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या. त्यामुळेच आज मुली, महिला चांगले शिक्षण घेवून विविध क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवीत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. परदेशी यांनी यावेळी महिला व मुलींची सुरक्षा, लैंगिक अपराधापासून बालकांचे रक्षण अधिनियम (पोक्सो) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींशी संवाद साधून सायबर गुन्ह्यांबाब त्यांच्या शंकांचे निराकरण केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

कार्यक्रमाला राजस्थान आर्य महाविद्यालय, श्री शिवाजी विद्यालय, बाकलीवाल विद्यालय, बाकलीवाल कन्या विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, माउंट कार्मेल विद्यालय, सरस्वती महाविद्यालय, गोटे महाविद्यालय, रेखाताई कन्या शाळा, हॅपी फेसेस स्कूल, सुशीलाबाई जाधव शाळा, लॉयन्स विद्या निकेतन, जिल्हा परिषद उर्दू शाळा, जिल्हा परिषद हायस्कूल, मालतीबाई सरनाईक विद्यालय, सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन येथील विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका, पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्थांच्या महिला प्रतिनिधी, बचत गटाच्या प्रतिनिधी यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. याठिकाणी स्पर्धा परीक्षा विषयक पुस्तके, लोकराज्य मासिक, बचत गटांची उत्पादने आदी स्टॉल लावण्यात आले होते. उपस्थितांचे आभार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बन्सोड यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर