वाहतूक नियमांविषयी जनजागृतीसाठी विविध उपक्रम



११ ते १७ जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह
·         निबंध, चित्रकला स्पर्धेचे आयोजन
·         हेल्मेट विषयी जनजागृतीसाठी रॅली
वाशिम, दि. ०९ :  जिल्ह्यात ११ ते १७ जानेवारी २०२० या कालावधीत ३१ वा रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. या अंतर्गत वाहतूक नियमांविषयी जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जाणार असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताह अंतर्गत परिवहन विभागामार्फत जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स लावून व माहिती पत्रके वितरीत करून वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांसंबंधी पुस्तिकेचे तसेच रस्ता सुरक्षा विषयक पत्रकाचे वितरण करण्यात येणार आहे. बसस्थानक, महामार्ग, चौक अशा विविध ठिकाणी चालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक नियमांविषयी जनजागृतीसाठी ‘वॉकेथॉन’चेही आयोजन करण्यात येणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती होण्यासाठी शालेय स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. स्कूल बस चालक व मालक यांची कार्यशाळा आयोजित करून स्कूल बस सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच मोटार वाहन चालकांकरिता प्रबोधन व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. जिह्यातील मुख्य चौकांमध्ये सभा घेवून रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम शहरात हेल्मेट रॅली काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रिक्षा चालकांशी संवाद साधून त्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात वाहूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोषी वाहनचालकांना पुष्पगुच्छ देवून त्यांच्याकडून नियमानुसार दंड वसुली करण्यात येणार आहे. तसेच त्यांना मोटार वाहन नियम व वाहतुक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकरी यांनी कळविले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे