विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम २.० अंतर्गत लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक


वाशिम, दि. ०८ : गरोदर माता व ० ते २ वर्षे वयोगटातील बालकांच्या लसीकरणासाठी ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य २.०’ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा ६ जानेवारी २०२० पासून सुरु झाला असून मोहिमेंतर्गत निश्चित केलेले गरोदर माता व बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, ८ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. संदीप हेडाऊ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मेहकरकर, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. एस. व्ही. देशपांडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अश्विन हाके, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, युनिसेफचे सल्लागार डॉ. शैलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, विशेष मिशन इंद्रधनुष्य २.० मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्याने ९९ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या टप्प्यातही सर्व यंत्रणांनी चांगली कामगारी करून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे. जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह तालुकास्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देवून लसीकरण मोहीम व्यवस्थित राबविली जात असल्याची खात्री करावी. प्रत्येक दोन ते तीन दिवसांनी मोहिमेचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर म्हणाले, विशेष मिशन इंद्रधनुष्य २.० मोहिमेमध्ये दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागात ११७ व शहरी भागात ३३ लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १४८ व शहरी भागातील ३१ अशा एकूण १७९ गरोदर माता यांच्यासह ग्रामीण भागातील ८७८ व शहरी भागातील ३८२ अशा एकूण १२६० बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. लसीकरणाची कार्यवाही ६ जानेवारीपासून सुरु झाली असून पहिल्या दोन दिवसात ३६१ बालके व ५० गरोदर मतांचे लसीकरण झाले आहे. चार टप्प्यांमध्ये ही मोहीम होत असून फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोहिमेचा तिसरा व चौथा टप्पा राबविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे