अकुशल मजुरांना गावातच मिळणार रोजगार
* ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा पातळीवर नोंदविता येईल कामाची मागणी
वाशिम, दि. १७ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील मजुरांनी मागणी केल्यानंतर त्यांना गावात अथवा लगतच्या गावात रोजगार उपलब्ध करून दिला जातो. तरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील जॉबकार्डधारक अकुशल मजुरांनी रोजगाराची आवश्यकता असल्यास संबंधित ग्रामपंचायत, तालुका स्तरावर अथवा जिल्हा स्तरावर कामाची मागणी नोंदवावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे यांनी केले आहे.
जिल्ह्यातून कामानिमित्त होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी, त्यांना मागणीनंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. यासाठी जिल्ह्यात ४ हजार ११९ कामे सेल्फवर ठेवण्यात आली आहेत. यामधून १२ लक्ष ८३ हजार ३६३ मजूर क्षमता निर्माण होणार आहे.
काम मागणीसाठी जॉबकार्डधारक अकुशल मजुरांनी नमुना क्र. ४ मध्ये लेखी अर्ज ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, पंचायत समिती अथवा तहसील कार्यालय, जिल्हा परिषद अथवा जिल्हाधिकारी कार्यालय यापैकी कोणत्याही एका ठिकाणी भरून द्यावा. या अर्जासोबत बँक पासबुकची व आधारकार्डची छायांकित प्रत जोडावी. ज्या मजुरांकडे जॉबकार्ड नाही, अशा मजुरांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती अथवा तहसील कार्यालयाकडे तात्काळ जॉबकार्डची मागणी नोंदवावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment