तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे ॲागस्टपर्यंत पूर्ण करा- पालकमंत्री संजय राठोड

*तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे ॲागस्टपर्यंत पूर्ण करा*
- पालकमंत्री संजय राठोड

> पोहरादेवी व उमरी येथील विकासकामांचा आढावा
> मंत्री, खासदारांकडून कामाचे कौतुक
> नंगारा भवन बांधकामाचे ८० टक्के काम पूर्ण

वाशिम (जिमाका) : श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि उमरी व पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे ॲागस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज प्रशासनाला दिले. 

तीर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी येथे सुरु असलेल्या शासनाच्या विविध विकासकामांसंदर्भात पालकमंत्री संजय राठोड यांनी नंगारा भवनातील सभागृहात आढावा घेतला. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, खासदार डॅा.श्रीकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी येथे सुरु असलेल्या विकासकामांचे आणि नंगारा भवन बांधकामाच्या प्रगतीचे कौतुक करण्यात आले. या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे तसेच नंगारा भवनाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे. राज्य सरकारने सुमारे  सव्वा सातशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पाणीपुरवठा संबंधित कामांचा आढावा घेतांना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे देशभरातून लाखो भाविक येतात. याठिकाणी येत्या काळात पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी सूक्ष्म नियोजन करुन पाणीपुरवठ्याचे काम करावे, असे निर्देश मंत्री श्री.पाटील यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी रस्त्यांच्या कामांची माहिती घेतली. श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेवून नियोजन करावे. पोहरादेवी, उमरीगड आणि नंगारा भवन परिसरातील रस्ते समृद्धी महामार्गाला जोडण्याबाबत अभ्यास करुन प्रस्ताव शासनस्तरावर सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नंगारा भवन व वास्तू संग्रहालयातील अंतर्गत काम पाहून खासदार डॅा. श्रीकांत शिंदे यांनी कौतुक केले. हा नंगारा भवन नागरिकांसाठी उपलब्ध व्हावा यादृष्टिने लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.

यावेळी पालकमंत्री संजय राठोड, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, खासदार डॅा.श्रीकांत शिंदे यांनी नंगारा भवनाच्या प्रगतीपथावरील कामांची संयुक्त पाहणी केली. यावेळी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी प्रगतीपथावरील कामांची माहिती दिली. नंगारा भवन बांधकामाचे  ८० टक्के काम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावटीचे काम ४० टक्के पूर्ण झाल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. बैठकीच्या सुरुवातीला अमरदिप बहल यांनी नंगारा भवनातील अंतर्गत कामांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
०००

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश