बचत गटातील महिलांनी आपल्या उत्पादनाचा ब्रँड तयार करावा- शंकर कोकडवार

बचत गटातील महिलांनी आपल्या उत्पादनाचा ब्रँड तयार करावा
- शंकर कोकडवार

> माविमतर्फे महिला बचत गट निर्मित वस्तूंच्या तालुकास्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन

> २३ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन

वाशिम (जिमाका) : बचत गटातील महिलांनी आपल्या उत्पादनाचा ब्रँड तयार करावा, असे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक शंकर कोकडवार यांनी आज येथे केले. 

मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत महिला बालविकास विभागाच्या महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत लोकसंचालित साधन केंद्र वाशिम यांच्या अंतर्गत महिला बचत गट निर्मित वस्तूंची नवतेजस्विनी प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन २० ते २३ फेब्रुवारीपर्यंत विठ्ठलवाडी मंगल कार्यालय वाशिम येथे करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन शंकर कोकडवार यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रियंका गवळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे उद्घाटक शंकर कोकडवार म्हणाले की, बचत गटातील महिलांनी सोशल मीडियाचा वापर करून आपल्या उत्पादित वस्तूंचा प्रचार व प्रसार करावा. आपल्या उत्पादनाचा ब्रँड तयार करून बाजारपेठेमध्ये विकावा. 

संजय खंबायत यांनी बचत गटाच्या उत्पादित वस्तूंचे कौतुक केले व जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत बचत गटाकरिता सीएमईजीपीमार्फत नव्याने सुरू झालेल्या पोर्टलद्वारे कर्ज प्रस्ताव सादर करून शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
 
प्रियंका गवळी यांनी मार्गदर्शनातून महिलांनी स्वावलंब कसे व्हावे व आपली व आपल्या कुटुंबाची कशा पद्धतीने उन्नती साधता येईल याबाबत मार्गदर्शन केले. महिला व बालविकास विभाग सदैव आपल्या सोबत राहील, अशी ग्वाही दिली.

या उद्घाटनाप्रसंगी माविमच्या सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी त्रिशुला घ्यार, कार्यक्रमाधिकारी प्रांजली वसाके, लेखाधिकारी गौरव नंदनवार, सहायक सहनियंत्र अधिकारी कल्पना लोहकपुरे तसेच माविम जिल्हा कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 तसेच लोकसंचालित साधन केंद्र वाशिम व्यवस्थापक संतोष मुखमाले, लोकसंचालित साधन केंद्र कळंबा महालीचे व्यवस्थापक प्रमोद गोरे, लोकसंचालित साधन केंद्र अनसिंगच्या व्यवस्थापक संगीता शेळके, सीएमआरसी रिसोडचे व्यवस्थापक प्रदीप तायडे, पोहरादेवीच्या व्यवस्थापक कुसुम रूपणे, मंगरूळपीरच्या व्यवस्थापक दिपाली चौधरी व सीएमआरसीचे लेखापाल विनय पडघान, प्रदीप देवकर, सीमा पाचपिल्ले, सीएमआरसीमधील उपजीविका सल्लागार नंदकिशोर राठोड, अरुण सुर्वे व जिल्ह्यातील सर्व सीएमआरसीचे सहयोगांनी व सीआरपी उपस्थित होते.

या तालुकास्तरीय प्रदर्शनीला जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी व बचत गटामार्फत निर्मित वस्तूंचा लाभ घ्यावा, असे आवाहन संतोष मुखमाले यांनी केले

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश नागपुरे यांनी केले.
०००००

Maharashtra DGIPR

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश