जिल्ह्यात १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम
जिल्ह्यात १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम
*१९ वर्षाखालील मुलामुलींनी जंतनाशक गोळी घ्यावी*
- जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
> शाळा, अंगणवाडीमध्ये जंतनाशक गोळ्याचे वाटप
वाशिम, (जिमाका) : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आरोग्य विभागामार्फत दि. १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील मुलामुलींनी जंतनाशक गोळी घ्यावी व त्यासाठी पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.
या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयामध्ये एक ते १९ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना अल्बेनडाझोल ही जंतनाशक गोळी मोफत दिली जाणार आहे. तसेच शाळाबाह्य मुलामुलींकरिता ही जंतनाशक गोळी अंगणवाडी सेविकांमार्फत दिल्या जाणार आहेत. या मोहिमेत सहभागी यंत्रणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
१ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मोहिमेदरम्यान गंभीर परिस्थिती उद्भवल्यास परिस्थिती हाताळण्याबाबत मार्गदर्शक सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
ही मोहीम आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण विभाग, नगर विकास, महिला व बाल विकास विभाग (आयसीडीएस), पंचायत राज विभाग आदींच्या सहभागाने राबविली जात आहे.
*जंतसंसर्ग कसा होतो व लक्षणे*
जंतांचा प्रसार हा संसर्गजन्य व्यक्तीच्या शौचावाटे मातीत मिसळलेल्या जंतांच्या अंडीतून होतो. ही अंडी मातीत वाढतात. अन्नातून व अस्वच्छ हाताने शरीरात जाते. मोठ्या प्रमाणात जंतसंसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये तीव्र स्वरुपातील लक्षणे दिसून येण्याची शक्यता असते. तीव्र संसर्गामुळे अतिसार, पोटदुखी, अशक्तपणा व मंदावलेली भूक यासारखी विविध प्रकारची लक्षणे दिसून येऊ शकतात. सौम्य प्रमाणात संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये साधारणपणे कोणतीच लक्षणे दिसत नाहीत.
*आरोग्यावर जंतांचा परिणाम ?*
जंतसंसर्गामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या आरोग्यावर विविध प्रकारचे दुष्परिणाम दिसून येतात. जसे जंतांमुळे रक्तक्षय होतो.
जंतसंसर्गामुळे आरोग्याची हानी होऊन त्याचा विकास व शारीरिक वाढ यावर मोठा दुष्परिणाम होतो. शरीरातील पोषकद्रव्यांवर परिणाम, रक्ताची हानी व कुपोषण, वाढ खुंटते, 'अ' जीवनसत्त्वावर परिणाम करू शकतो. तीव्र संसर्गामुळे बालक आजारी पडतो व थकवा जाणवतो. बालकाचा शारीरिक व बौद्धिक विकास खुंटतो.
*जंतसंसर्ग थांबवण्यासाठी काय करावे ?*
जेवणापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यावर हात स्वच्छ धुवावेत, शौचालयाचा वापर करावा, पायात चपला व बूट घालावेत,
निर्जंतुक व स्वच्छ पाणी प्यावे. व्यवस्थित शिजवलेले अन्न खावे. निर्जंतुक व स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धुवावीत. नखे नियमित कापावीत व स्वच्छ ठेवावीत.
*जंतनाशक गोळीचे फायदे :
रक्तक्षय कमी होतो व आरोग्य सुधारते, बालकांची वाढ होते व निरोगी बनतात, अन्य संसर्गाचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते, शाळेतील उपस्थिती वाढण्यास मदत होते, बालकाची आकलनशक्ती सुधारते व अधिक क्रियाशील बनतात, मोठेपणी काम करण्याची व दीर्घकाळ अर्थार्जन करण्याची क्षमता वाढते.
*कोणती गोळी घ्यायची ?*
जंतनाशक गोळी ही शासकीय रुग्णालयात विनामूल्य उपलब्ध आहे. जंतसंसर्गावर अलबेंडझोल टॅब्लेट आयपी ही गोळी घ्यावी. या जंतनाशक गोळीचा वयानुसार डोस घ्यावा. १ ते २ वर्षातील बालकांना अर्धी गोळी (२०० मि.ग्रॅ.) व २ ते १९ वर्षाच्या बालकांना पूर्ण गोळी (४०० मि.ग्रॅ.) द्यावी.
*मॅाप अप मोहीम*
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत आजारी मुलामुलींना जंतनाशक गोळी दिली जाणार नाही. गैरहजर व आजारी बालकांना २० फेब्रुवारी रोजी मॅाप अप दिनी जंतनाशक गोळी दिली जाईल. तसेच आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयात ही मोफत उपलब्ध करण्यात आली आहे.
या मोहिमेचा लहान बालकांना लाभ होण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००
Comments
Post a Comment