१० वी, १२ वी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम १४४ लागू



१० वी, १२ वी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम १४४ लागू

       वाशिम, दि. २० (जिमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी परिक्षा संपेपर्यंत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम १४४ लागु करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी जारी केले आहे.

इयत्ता १२ वी ची परीक्षा ही २१ फेब्रुवारी ते २३ मार्चपर्यंत आणि इयत्ता १० वी ची १ मार्च ते २६ मार्चपर्यंत घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या कालावधीत असामाजिक प्रवृत्तीच्या समुदायाकडून गर्दी होऊन गोंधळ व गैरप्रकार करण्याची शक्यता असल्याने, या परीक्षा केंद्राभोवती कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने परीक्षा कालावधीत परीक्षा संपेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी २०० मीटरच्या परीक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी लागू केले आहे.

          हे आदेश लागु केल्यामुळे अनेक बाबींना मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षा उपकेंद्रावर ओळख पत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परीक्षेत्रात केंद्राधिकारी, उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त केलेले समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी सोडून इतर व्यक्तींना प्रवेशास मनाई राहील. परीक्षा केंद्रावर २०० मीटरच्या आत रस्त्यावरुन वाहने नेण्यास मनाई राहील. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, ध्वनीक्षेपके इत्यादी सुविधांवर प्रतिबंध घालण्यात येत आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन, वायरलेस सेट, रेडिओ, दूरदर्शन, कॅलक्युलेटर, संगणक वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी चारपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे या आदेशात नमुद केले आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश