समता’ चित्ररथाने दिली समाज कल्याण योजनांची माहिती



‘समता’ चित्ररथाने दिली

समाज कल्याण योजनांची माहिती

       वाशिम, दि. 03 (जिमाका) : समाज कल्याण विभागाच्या महत्वपूर्ण योजनांची माहिती लाभार्थ्यांना व नागरीकांना व्हावी आणि लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमने अनुसूचित जाती उपयोजना सन 2022-23 अंतर्गत समाज कल्याण योजनांची माहिती ‘समता’ चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हयातील ग्रामीण आणि शहरी भागात दिली.

          जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी 8 फेब्रुवारी 2023 रोजी या चित्ररथाचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. चित्ररथावर आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, मार्जिन मनी योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, मुला-मुलींसाठी निवासी शाळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व शेळी गट वाटप योजना आदी योजनांची सचित्र माहिती दर्शविण्यात आली. योजनांचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटी व शर्तीची माहिती देखील देण्यात आली. तसेच चित्ररथाच्या प्रमोटरच्या माध्यमातून समाज कल्याण योजनांची माहिती असलेली ‘समर्पण’ ही घडिपुस्तिका नागरीकांना व लाभार्थ्यांना वाटप करण्यात आल्या.

          चित्ररथावर असलेल्या ऑडिओ सिस्टीमवरुन कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, मुला-मुलींकरीता शासकीय वसतीगृहे, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींसाठी निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य या योजनांचे जिंगल्स नागरीक व लाभार्थ्यांना ऐकविण्यात आले. जिल्हयातील 200 पेक्षा अधिक गावांमध्ये चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या महत्वपूर्ण योजनांची माहिती देण्यात आल्यामुळे संबंधित शहरातील व गावातील लाभार्थ्यांना भविष्यात योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे