18 ते 20 मार्च दरम्यानमहिला बचतगटांच्या उत्पादीत खाद्यपदार्थ व वस्तूंचे विभागीय प्रदर्शन प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे वसुमना पंत यांचे आवाहन

18 ते 20 मार्च दरम्यान
महिला बचतगटांच्या उत्पादीत खाद्यपदार्थ व वस्तूंचे विभागीय प्रदर्शन
 
प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे वसुमना पंत यांचे आवाहन 

वाशिम दि.17(जिमाका) ग्रामविकास व पंचायतराज विभाग,विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. वाशिमच्या संयुक्त वतीने  18 ते 20 मार्च दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथील मैदानावर अमरावती विभागातील महिला बचतगटांनी उत्पादीत केलेल्या खाद्यपदार्थाच्या व वस्तूचे विभागीय प्रदर्शन व विक्री अर्थात वर्‍हाडी जत्रेला जिल्हावासीयांनी मोठया संख्येने भेट देवून लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
          16 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्र परिषदेत त्यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.यावेळी जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
             श्रीमती पंत म्हणाल्या की, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ व साहित्याला व्यासपिठ उपलब्ध करून देणे,बचतगटांची उत्पादने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविणे, सांस्कृतिक विरंगूळा साधण्यासाठी या उद्देशातून हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात महिला बचत गटाचे १०० स्टॉल,सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी आणि छोट्या बालकांसाठी घसरगुंडीही राहणार आहे. 
       अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील बचतगटांचा सहभाग या वऱ्हाडी जत्रेमध्ये राहणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे असतील. प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जि.प.उपाध्यक्ष चक्रधर गोटे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती वैशाली लळे,अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी,कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती वैभव सरनाईक, समाजकल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे यांची उपस्थिती राहणार आहे.
         प्रदर्शनादरम्यान लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आणि उड्या मारण्यासाठी जम्पींग जाळीही राहणार आहे.पहिल्या दिवशी बंजारा सांस्कृतिक नृत्य,सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गोंधळ,पोतराज, वासुदेव यांच्या भूमिकेत कार्यक्रमांची धमाल,सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत विनोदी कार्यक्रम आणि रात्री 8 ते 10 या वेळेत पंकजपाल महाराजांचे समाजप्रबोधनपर किर्तन राहणार आहे. 
          दुसर्‍या दिवशी 19 मार्च रोजी भारूड,पोवाडा,लोकगित,एकांकिका, दिव्यांग कलावंत आर्केष्ट्रा व रात्री 8 ते 10 या वेळेत सप्तखंजिरीवादक डॉ. रामपाल महाराज यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन होणार आहे. 
         शेवटच्या दिवशी 20 मार्च रोजी सकाळी 10.30 ते 11 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम,सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत अ‍ॅड.दिपाली सांबर (श्रृंगारे) यांचे व्याख्यान आणि दुपारी 2 वाजतानंतर उत्कृष्ट बचतगटांचा सत्कार व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाने तीन दिवशीय प्रदर्शनाचा समारोप होईल.अशाप्रकारचे विभागीय प्रदर्शन जिल्ह्यात पहिल्यांदाच होत आहे.त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पुर्ण उत्साहाने कामाला लागली आहे.या भव्य सरस प्रदर्शनचा जिल्हावासीयांनी लाभ घ्यावा.असे आवाहन श्रीमती पंत यांनी पत्रपरिषदेत बोलतांना केले.
       *प्रदर्शनामध्ये बचत गटांचे 100 स्टॉल*
  विभागीय प्रदर्शनामध्ये बचतगटांचे एकुण 100 स्टॉल राहणार आहेत. यापैकी 80 स्टॉल हे बचतगटांनी तयार केलेल्या हस्तकला व शोभेच्या वस्तु, विविध प्रकारचे पापड,लोणचे, उच्च दर्जाचे बेसन लाडू,पिठाची खारीक, शेवगा पावडर यांसह अन्य वस्तूंचे तर 20 स्टॉल हे खाद्य पदार्थाचे राहणार आहेत. एकुण 100 पैकी 60 स्टॉल हे वाशिम जिल्ह्यातील बचतगटाचे आणि प्रत्येकी 10 या प्रमाणात 40 स्टॉल हे इतर चार जिल्ह्यांतील राहणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे