बचत गटांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा

बचत गटांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका 
          जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे

 उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा 

वाशिम दि.25 (जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळाने  राज्यातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र करून त्यांच्या सक्षमीकरणाला सुरुवात केली. त्यामुळेच आज जिल्ह्यातील प्रत्येक  गावात महिलांचे बचत गट कार्यरत आहे. बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित वस्तू व साहित्याच्या विक्रीतून महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणाला हातभार लागत आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्याची आपली भूमिका असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.
            24 मार्च रोजी विठ्ठलवाडी मंगल कार्यालय, वाशिम येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन श्री. ठाकरे यांनी केले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 
             प्रमुख अतिथी म्हणून मंगरूळपीर पंचायत समितीचे माजी उपसभापती भास्करराव पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी, कृषी अधिकारी दिलीप कंकाळ व माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांची मंचावर उपस्थिती होती. 
               श्री ठाकरे म्हणाले,बचत गटांच्या क्षेत्रात माविमचे काम सुरुवातीपासूनच आहे.महिलांना माविमने एक सशक्त व्यासपीठाच उपलब्ध करून दिले आहे.त्यामुळेच महिला आज साहित्य व वस्तूंची निर्मिती करताना दिसत आहे. त्यांना सामाजिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर त्यांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी शासनाने बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी असलेल्या बचत गटातील महिलांनी उद्योग व्यवसाय सुरू करावेत. ज्या गावांमध्ये पोकरा प्रकल्प राबविण्यात येत आहे, त्या गावातील महिला बचत गटांना कृषी विभागाने मदत करावी. जिल्ह्यातील पंचायत समिती इमारतीच्या आवारात असलेली दुकाने काही आठवड्यांकरिता महिला बचत गटांची उत्पादने विक्री करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी त्यांनी संबंधित पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करावा,असे सांगितले. 
         बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व साहित्याची गुणवत्ता राखली पाहिजे असे सांगून श्री ठाकरे म्हणाले, वस्तू ह्या आकर्षक पॅकिंगमध्ये असल्या पाहिजे. ज्यामुळे ग्राहक हा त्याकडे आकर्षित होऊन खरेदी करण्यास प्रवृत्त होईल. अमानी येथील गोडंबी उत्पादक बचतगट आणि कारंजा येथील पिठ तयार करणारा बचतगटांचे ज्या प्रमाणे आकर्षक पॅकिंग आहे,अशाच प्रकारचे अनुकरण इतरही बचत गटांनी आपल्या उत्पादित मालाबाबत करावे. बचत गटांच्या उत्पादित वस्तू ह्या मोठमोठ्या मार्केटमध्ये ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी माविमने पुढाकार घ्यावा असे ते म्हणाले.
            श्री कंकाळ म्हणाले,कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनाचा बचत गटातील महिलांनी लाभ घेऊन शेतीपूरक व्यवसायाची सुरुवात करावी.कृषी विभागामार्फत बचत गटातील महिलांना सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 
              प्रास्ताविकातून बोलताना श्री.नागपुरे म्हणाले, नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माविम जिल्ह्यातील 345 गावात काम करत आहे. 4177 बचत गटांच्या माध्यमातून 44 हजार 410 महिलांचे संघटन तयार झाले आहे. 3942 बचत गटांना विविध बॅंकामार्फत 181 कोटी 62 लक्ष रुपये कर्ज वितरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.    
          प्रारंभी श्री.ठाकरे यांनी फित कापून प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन केले. या निमित्ताने लावण्यात आलेल्या 50 स्टॉल्सची देखील पाहणी करून बचत गटांच्या महिलांशी त्यांनी संवाद साधला. 
          याप्रसंगी जिल्ह्यातील माविमअंतर्गत कार्यरत असलेल्या बचत गटांच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख,जिल्ह्यातील सर्व बारा लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक शरद कांबळे, लता इंगळे, प्रदीप तायडे,संतोष मुखमाले, प्रमोद गोरे,संगीता शेळके,सीमा मनवर,दिपाली चौधरी,विजय वाहने कुसुम रूपने,सर्व लेखापाल व उपजीविका सल्लागार व सहयोगीनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. माविमच्या सहाय्यक सहनियंत्रण अधिकारी कल्पना लोहकपुरे यांनी संचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे