परिवर्तन चित्ररथाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
- Get link
- X
- Other Apps
परिवर्तन चित्ररथाचा
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
वाशिम, दि. 10 (जिमाका) : सर्वसाधारण विविध महत्वपूर्ण योजनांची माहिती संबंधित घटकातील लाभार्थ्यांना व्हावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2022-23 अंतर्गत तयार केलेल्या परिवर्तन चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 10 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून केला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
परिवर्तन चित्ररथावर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मनोधैर्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, शुभमंगल सामुहिक विवाह योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि माझी कन्या भाग्यश्री या योजनांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. योजनेच्या अटी, लाभाचे स्वरुप व संपर्क कोणत्या कार्यालयाशी साधावा याबाबतची देखील माहिती चित्ररथावर दर्शविण्यात आली आहे.
चित्ररथामध्ये असलेल्या ऑडिओ सिस्टीममधून मनोधैर्य योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना, दुधाळ जनावरांचे गट वाटप, मच्छिमार सहकारी संस्थांना अर्थ सहाय्य, जननी शिशु सुरक्षा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व शुभमंगल सामुहिक विवाह योजना आदी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. चित्ररथासोबत असलेल्या प्रमोटरच्या माध्यमातून सर्वसाधारण योजनांवर आधारीत असलेल्या समभाव या घडिपुस्तिकेचे देखील वितरण करण्यात येणार आहे. चित्ररथावरील माहिती, 11 महत्वपूर्ण योजनांचे ऑडिओ जिंगल्स आणि समभाव घडिपुस्तिकेच्या माध्यमातून विविध महत्वपूर्ण योजनांची माहिती जिल्हयातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरीकांना मिळण्यास मदत होणार आहे. या माहितीमुळे लाभार्थी व नागरीक विविध कार्यालयाशी संपर्क साधून भविष्यात योजनांचा लाभ घेतील.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment