बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणास मदत जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे वऱ्हाडी जत्रेचे उद्घाटन

बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणास मदत 
            जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे 

                वऱ्हाडी जत्रेचे उद्घाटन

वाशिम दि 18 (जिमाका) बचत गटांच्या माध्यमातून महिला एकत्र आल्या आहेत. केवळ एकत्र येऊन त्या थांबला नाहीत,तर त्यांनी उद्योग व्यवसायाला सुरुवात केली आहे. अशाप्रकारच्या प्रदर्शनातून त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होत आहे.बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या सक्षमीकरणाला मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले. 
            आज जिल्हा क्रीडा संकुल येथे विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद वाशिम यांच्या संयुक्त वतीने महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थाचे प्रदर्शन व विक्री अर्थात वऱ्हाडी जत्रेचे उद्घाटन करताना आयोजित कार्यक्रमात श्री. ठाकरे बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे,जि.प सदस्य पांडुरंग ठाकरे, दत्ता तुरक, कारंजा पंचायत समिती सभापती प्रवीण देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, उपायुक्त (विकास) राजीव फडके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांची उपस्थिती होती.
            श्री ठाकरे म्हणाले,उमेदच्या महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले काम होत आहे. जिल्ह्यात उमेद अभियानांतर्गत स्थापित बचत गटांना फिरता निधी वाटपाचे शासनाने दिलेले उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केले आहे.राज्यात चांगले काम उमेद अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरू आहे. पंचायत समिती कार्यालय परिसरात बांधण्यात आलेली दुकाने बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.तालुक्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व साहित्याची या दुकानातून विक्रीस मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            श्री.पांडुरंग ठाकरे म्हणाले, महिला सक्षमपणे कुटुंब सांभाळत आहे. महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास बचत गटाची भूमिका महत्त्वाची आहे. बचत गट हा मोठा रोजगार निर्मिती करणारा समूह आहे. बचत गटांनी निर्माण करण्यात येणाऱ्या वस्तू ह्या दर्जेदार असल्या पाहिजे, तेव्हाच उत्पादित साहित्याची खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील.बचत गटातील महिलांच्या आर्थिक सक्षमतेकडे शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता त्यांनी विषद केली. 
          प्रस्ताविकातून बोलताना श्रीमती पंत म्हणाल्या, या वऱ्हाडी जत्रेतून बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री होणार असल्यामुळे बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल. उमेद महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंची खरेदी करून त्यांच्या सक्षमीकरणाला हातभार लावावा. जिल्ह्यातील उमेदच्या बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना फिरता निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
           यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी या वऱ्हाडी जत्रेसाठी पाठविलेला शुभेच्छा संदेश प्रकल्प संचालक श्री.कोवे यांनी वाचून दाखविला.
        या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते आर आर उर्फ आबा पाटील सुंदर गाव स्पर्धा योजनेतील जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर यशस्वी ठरलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच सचिव व गट विकास अधिकारी यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
       जिल्हास्तरावरचा पुरस्कार कारंजा तालुक्यातील गायवळ ग्रामपंचायतने पटकविला. तालुकानिहाय यशस्वी ठरलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे. ब्रह्मा (ता.वाशिम), गोवर्धन (ता.रिसोड), जांब (ता. मंगरूळपीर),कारखेडा (ता.मानोरा), ढोरखेडा (ता.मालेगाव) आणि गायवळ (ता.कारंजा) या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सचिव आणि गटविकास अधिकारी यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
           प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बंजारा संस्कृतीचे दर्शन घडवणारे बंजारा नृत्य महिलांनी सादर केले.प्रदर्शनात वाशिम जिल्ह्यासह अमरावती,यवतमाळ,अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले आहे.    
    यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, यंत्रणांचे अन्य अधिकारी,सर्व गट विकास अधिकारी व सह गट विकास अधिकारी यांची उपस्थिती होती. संचालन उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव व चाफेश्वर गांगवे यांनी केले.आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांनी मानले.कार्यक्रमाला बचत गटातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे