पर्यटन मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांची शिरपुर येथील आंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदीराला भेट अंगणवाडी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची केली पाहणी



पर्यटन मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांची शिरपुर येथील आंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदीराला भेट

अंगणवाडी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची केली पाहणी

       वाशिम, दि. 21 (जिमाका) : पर्यटन, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आणि महिला व बाल विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मालेगाव तालुक्यातील शिरपुर (जैन) येथील आंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदीराला भेट देऊन पार्श्वनाथाचे दर्शन घेतले.

          सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तब्बल 42 वर्षानंतर शिरपुर येथील आंतरिक्ष पार्श्वनाथ मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर खुले केल्यानंतर श्वेतांबर व दिगंबर या जैन धर्मातील पंथीयांमध्ये मूर्ती लेपनावरुन वाद निर्माण झाला होता.मंत्री श्री. लोढा यांनी दोन्हीही पंथीयांच्या मंदिर विश्वस्त व सदस्यांची भेट घेऊन सामोपचाराने प्रकरणावर तोडगा काढून शांती प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.यावेळी श्री लोढा यांनी निकलंक भवन येथे मुनीश्री योगसागरजी महाराज आणि मुनीश्री सिद्धांतसागरजी महाराज यांची तर पारसबाग येथे पन्यासप्रवर श्री.विमलहंस विजयजी महाराज आणि पन्यासप्रवर श्री. परमहंस विजयजी महाराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नूतन चौमुखी जैन मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी हितेश मुथा,अतुलभाई, जैन तिर्थरक्षा समितीचे अध्यक्ष ललित धामी आणि श्री.अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त दिलीप शाह यांची उपस्थिती होती.

         मंत्री श्री.लोढा यांनी शिरपूर (जैन) येथील मिनी अंगणवाडी केंद्र क्रमांक 4 आणि 6 ला भेट देऊन विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खिचडीची चव चाखली.अंगणवाडीच्या व्यवस्थापनाची पाहणी करून मिनी अंगणवाडी सेविका अर्चना भोसले आणि उषा कांबळे यांचेशी चर्चा करून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शालेयपूर्व शिक्षण आणि आहाराबाबतची माहिती घेतली.

        मालेगांव तालुक्यातील अमानी येथे असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आकस्मिक भेट देऊन वर्गखोल्या आणि कार्यशाळेत जाऊन विद्यार्थ्यांसोबतच हितगुज केले.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत असलेल्या संस्था व्यवस्थापन समितीबाबतची माहिती प्रभारी प्राचार्यांकडून घेतली.समितीची सभा केव्हा झाली, सभेमध्ये कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, सभेचे इतिवृत्त तयार केले का,संस्थेत व्हच्युअल क्लास रूम तयार केली का तसेच विद्यार्थ्यांसाठी जीम कुठे तयार करणार,कॅन्टीन आणि शिक्षकांसाठी असलेल्या खोल्यांची माहिती घेतली. यावेळी श्री.लोढा यांनी संस्थेतील अभि चित्रकला कक्षाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी तसेच कार्यशाळेला भेट देऊन जोडारी विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला.

       यावेळी संस्थेचे प्रभारी प्राचार्य श्री.काळे,निर्देशक श्री.दहीकर,श्री. खडसे आणि श्रीमती गायकवाड यांचेसह संस्थेतील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

         श्री.लोढा यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मुंदडा यांना संस्थेतील अधिकारी व विद्यार्थ्यांचे स्वच्छतागृह नियमित स्वच्छ राहतील याकडे लक्ष देण्यासोबतच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना केल्या.

                                                                                                        *******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे