भविष्यातील शाश्वत शेतीसाठी जननद्रव्यांचे जतन व पुनर्वापर गरजेचे - डॉ.ग्यानेंद्रप्रताप सिंग ज्वारीसह इतर तृणधान्य पिकात यांत्रिकीकरणासह मूल्यवर्धन काळाची गरज - डॉ शरद गडाख ज्वारी जननद्रव्य प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम

भविष्यातील शाश्वत शेतीसाठी जननद्रव्यांचे जतन व पुनर्वापर गरजेचे - डॉ.ग्यानेंद्रप्रताप सिंग

ज्वारीसह इतर तृणधान्य पिकात     यांत्रिकीकरणासह मूल्यवर्धन काळाची गरज - डॉ शरद गडाख 

ज्वारी जननद्रव्य प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम

 वाशिम दि.14(जिमाका) बदलत्या जागतिक परिस्थितीत भारतीय शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर होण्यासाठी देशभरातील शेती संशोधक वर्ष गणिक मेहनत करीत आहे.पिकाच्या अधिक उत्पादनासाठी जननद्रव्यांचे जतन तसेच काल सुसंगत पुनर्वापर गरजेचा आहे.असे प्रतिपादन राष्ट्रीय पादप आनुवंशिक संशोधन ब्युरो,नवी दिल्लीचे निदेशक डॉ.ग्यानेंद्रप्रताप सिंग यांनी केले.
        डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,राष्ट्रीय पादप आनुवंशिक संशोधन ब्युरो,नवी दिल्ली आणि राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्था,हैदराबाद यांचे संयुक्त वतीने कृषी संशोधन केंद्र,वाशिम येथे 13 मार्च रोजी आयोजित " ज्वारी जननद्रव्य प्रक्षेत्र दिवस " कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ग्यानेंद्रप्रताप बोलत होते.या कार्यक्रमाला देशभरातून उपस्थित तृणधान्य वर्गीय पिकांचे संशोधक शास्त्रज्ञ तसेच शेतकरी  बंधू-भगिनीं उपस्थित होते. 
        राष्ट्रीय पादप अनुवंशिक ब्युरोकडे विविध पिकांचे लाखो जननद्रव्य उपलब्ध असून त्यांचे वापरातून काल सुसंगत नवीन पिक वानांची निर्मिती सोयीची होणार असल्याचे सांगतानाच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्वारी जननद्रव्यांची प्रत्यक्ष लागवड आणि संवर्धन साकारत एक अनोखा व दखलपात्र विक्रमच केल्याचे गौरवोद्गारसुद्धा डॉ. सिंग यांनी काढले. 
        तर 25 हजारावर जननद्रव्यांची एकाच ठिकाणी लागवड प्रत्यक्ष बघणे ही माझ्या आयुष्यातील दुर्मिळ घटना असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे महासंचालक श्री रावसाहेब भागडे यांनी केले. 
        पिक वाण निर्मितीसाठी कृषी शास्त्रज्ञांना किती क्लिष्ट प्रक्रियेमधून जावे लागते याची माहिती घेताना आधुनिक  शेती संशोधकांविषयी  विषयी निश्चितच आदराची भावना वृद्धीगत झाल्याचे सुद्धा श्री रावसाहेब भागडे यांनी आपल्या भावपूर्ण मार्गदर्शनात सांगितले. 
     तृणधान्य पिकांच्या जन-द्रव्यांचा काल सुसंगत पुनर्वापर भविष्यातील आरोग्यमय शेतीच्या क्रांतीची नांदीच ठरेल असे आश्वासक प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, महाबीज अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी केले. 
        कृषी संशोधन केंद्र वाशिमच्या आयोजित प्रक्षेत्र भेटीचे प्रसंगी उपस्थित संशोधक तथा शास्त्रज्ञांना अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी विद्यापीठ शास्त्रज्ञांनी मेहनत घेऊन या ठिकाणी ज्वारीच्या 25 हजार जननद्रव्यांची लागवड केली असून या जननद्रव्यांचा अभ्यास केला जाणार असल्याचे सांगताना आजची प्रक्षेत्र भेट शास्त्रज्ञ, बीजोत्पादक तसेच शेतकऱ्यांसाठी गौरवशाली पर्वणी ठरणार आहे,असा विश्वास डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ.गडाख यांनी व्यक्त केला.
      याप्रसंगी मंचावर इक्रिसॅटचे ज्वारी संशोधक प्रमुख डॉ. ईफ्रेम हबरिमा, विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे,विस्तार शिक्षण संचालक डॉ.धनराज उंदीरवाड़े, शिक्षण संचालक डॉ. श्यामसुंदर माने,अधिष्ठाता कृषि अभियांत्रिकी डॉ.सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ.देवानंद पंचभाई, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे,ज्वारी संशोधन विभागाचे प्रमुख डॉ.आर.बी.घोराडे,कृषि संशोधन केंद्र वाशीमचे प्रमुख डाॅ. भरत गिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
        आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने 16 एकर शेतामध्ये या जननद्रव्यांची संवर्धित प्रणाली (Augmented design) मध्ये लागवड करण्यात आली आहे. यातील बरीच जननद्रव्ये ही अतिशय दुर्मिळ स्वरूपाची आहेत. त्यासाठी एकंदरीत पुर्ण परिसरात नऊ विभाग करण्यात आले. त्यासोबतच ज्वारीचे सध्याचे सहा वैशिष्ट्यपूर्ण वाण हे नियंत्रक वाण म्हणून वापरण्यात आले आहेत. ज्वारी जननद्रव्ये तपासणी कार्यक्रम राष्ट्रीय पादप आनुवांशीक संसाधन ब्युरो (NBPGR) नवी दिल्ली यांनी पुरस्कृत केला आहे. भारतीय तृणधान्य संशोधन संस्था (IIMR) हैदराबाद व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्याची अंमलबजावणी केली असल्याचे कुलगुरू डॉ गडाख यांनी आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण व आत्मविश्वासदर्शक मार्गदर्शनात सांगितले. याप्रसंगी कुलगुरू डाॅ. गडाख यांनी मागील काही वर्षात ज्वारीची  लागवड कमी होण्यामागील कारणे व भविष्यातील उपाययोजना विषद केल्या. होप प्रकल्पसुद्धा त्यांनी विस्ताराने सांगत आता काळानुरुप शेतकऱ्यांना यंत्राच्या साह्याने काढणी करता येईल असे ज्वारीचे वाण संशोधीत करण्याची गरज प्रतिपादित केली. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदेशीर वाण शोधले जातील. आज आहारात ज्वारीची मागणी वाढत आहे. ज्वारीचे मूल्यवर्धन करून वेगवेगळ्या प्रकारचे अनेक पदार्थ बनवता येतात. कृषी विद्यापीठाने याबाबत पुढाकार घेत काम केले असल्याचे डाॅ. गडाख यांनी सांगितले.
        इक्रीसॅटचे संशोधक डाॅ. ईफ्रेम यांनी सांगितले की, मागील 10 ते 20 वर्षात ज्वारीचे क्षेत्र जगभर कमी झाले.ज्वारीच्या जागेवर मक्याची लागवड होऊ लागली.आता आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जगातील विविध देशात साजरे होत आहे. त्याचा फायदा निश्चितच या तृणधान्यवर्गीय पिकांना करता येईल. 
       श्री.मुळे म्हणाले,शासनाने तृणधान्य वर्षात प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. 
   प्रास्ताविक कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी केले.डाॅ.आम्रपाली आखरे यांनी संचालन केले.डॉ. रामेश्वर घोराडे यांनी उपस्थितांचे आभार  मानले. 
       कार्यक्रमापुर्वी जननद्रव्यांची लागवड केलेल्या ज्वारीच्या प्रक्षेत्राला शेतकरी,शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा, कुलगुरु डाॅ. शरद गडाख यांच्यासह इतर वरिष्ठ मान्यवरही सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे