अत्यल्प शेतीतून तीन भावंडांनी धरली विषमुक्त भाजीपाला शेतीची कास व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून भाजीपाल्याची विक्रीशेणखत व दशपर्णी अर्क व फळांपासूनच्या टॉनिकचा शेती व पिकांसाठी वापर


अत्यल्प शेतीतून तीन भावंडांनी धरली विषमुक्त भाजीपाला शेतीची कास

 

व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून भाजीपाल्याची विक्री

शेणखत व दशपर्णी अर्क व फळांपासूनच्या टॉनिकचा शेती व पिकांसाठी वापर

वाशिम,दि. 28 (जिमाका):जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करतात.काही शेतकरी संरक्षित सिंचनाच्या सुविधेचा वापर करून बारमाही पिके घेत आहे.काही शेतकरी तर अत्यल्प शेतीतून सुध्दा विविध प्रयोग करून पिकांचे उत्पादन घेत आहे.वाशिमपासून 18 किलोमीटर अंतरावर कारंजामार्गावर असलेल्या बिटोडा (तेली) येथील राऊत भावंडांनी केवळ दीड एकर शेतीत घाम गाळून विषमुक्त भाजीपाल्याच्या शेतीची कास धरून इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

      बिटोडा (तेली) येथील अशोक राऊत यांच्याकडे केवळ दीड एकर शेती.त्यांना सदाशिव,देवीदास आणि संदीप ही तीन विवाहित मुले. तीनही भावंडांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले.आपल्या वडिलांनी याच शेतीच्या भरवशावर आपले पालनपोषण केल्याची जाणीव ठेवून वडिलांच्या उतारवयात त्यांना आता शेतीत कष्ट करण्याची वेळ येऊ नये, यासाठी तिन्ही भावंडांनी सेंद्रिय पद्धतीने अर्थात विषमुक्त शेती करण्याचा निर्णय घेतला.त्याच्या अंमलबजावणीला सन 2014 पासून सुरुवात केली.अल्प शेतीतच वेगवेगळे रसायनमुक्त शेतीचे प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केली. विविध वनस्पतींच्या पानांपासून दशपर्णी अर्क तयार करायला त्यांनी सुरुवात केली,तेव्हा गावातील शेतकरी त्यांना हसायचे. पण त्यांच्या हसण्याकडे त्यांनी दुर्लक्ष करून प्रयोगात सातत्य सुरू ठेवले. केवळ ते दशपर्णी अर्कावरच थांबले नाही तर बाजारातून चांगल्या प्रतीची विविध प्रकारची प्रत्येकी एक ते दीड किलो फळे खरेदी करून ती घरी आणून ती एकत्र कुस्करून 200 लिटर क्षमतेच्या बॅरलमध्ये 100 लिटर पाण्यामध्ये 20 ते 25 लिटर गोमूत्र टाकून ती बॅरल हवा बंद करून 42 दिवसानंतर काढून त्याला गाळून घेऊन फळांपासून निघालेल्या अर्काचा वापर विविध भाजीपाल्यांवर टॉनिक म्हणून फवारणी करण्यासाठी करतात.दशपर्णी अर्क आणि फळांपासून तयार केलेले टॉनिक आपल्या शेतातील भाजीपाल्यांवर फवारणी करून उर्वरित अर्क आणि टॉनिकची ते विक्री करतात.टॉनिक 300 रुपये प्रति लिटर तर दशपर्णी अर्कची विक्री 200 रुपये प्रति लिटर याप्रमाणे करण्यात येते.एकरी 4 ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत नांगरणी केल्यानंतर शेतात टाकतात.

       घरातील तिनही भावंडांची लहान मुले आजारी पडायचे.तेव्हा तीनही भावंडांनी निर्णय घेतला की,यापुढे आपण बाजारातून आणलेला भाजीपाला खायचा नाही. आपल्या शेतातच उत्पादित होणारा भाजीपालाच दोन्ही वेळच्या भोजनात नियमित वापरण्यास सुरुवात केल्याचे सांगून संदीप म्हणाला,जेव्हापासून आम्ही घरच्या विषमुक्त भाजीपाल्याचा वापर दोन्ही वेळच्या जेवनात करीत आहोत, तेव्हापासून घरातील मुले आजारी पडण्याचे प्रमाण सन 2016 पासून जवळपास बंद झाले आहे.मुलांच्या व कुटुंबातील सदस्यांच्या आजारावर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.आई-वडिलांसह तीन भावंडांच्या कुटुंबातील एकूण बारा सदस्य हे संयुक्त कुटुंब पद्धतीने गुण्यागोविंदाने एकत्र राहतात.

        एकदा वाशिम येथे मुलाला बालरोग तज्ञाकडे दाखवण्यासाठी संदीप घेऊन गेला असता बालरोग तज्ञाला सांगितले की,आम्ही आमच्या शेतात विषमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन घेतो. आपण आम्ही उत्पादित केलेला भाजीपाला घेणार का असे विचारले असता डॉक्टरांनी सहमती दर्शवून त्यांचे इतर सहकारी डॉक्टर्स भाजीपाला नियमित खरेदी करण्यास तयार झाले.भाजीपाल्याला ग्राहक मिळाल्यामुळे घरपोच आठवड्यातून दोनदा भाजीपाला देण्यात येतो.

       " सेंद्रिय भाजीपाला " या नावाचा संदीपने व्हाट्सअप या समाज माध्यमावर एक ग्रुप तयार केला आहे.या ग्रुपमध्ये वाशिम शहरातील डॉक्टर्स, अधिकारी,कर्मचारी तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 109 व्यक्तींचा समावेश आहे.दर बुधवारला शेतात उत्पादित होणाऱ्या भाजीपाल्यांची यादी या ग्रुपवर देण्यात येते.त्यानुसार ग्रुपवरील ग्राहक सदस्य भाजीपाल्यांची मागणी नोंदवि‍तात. गुरुवारी आणि सोमवारी ग्रुपवरील सदस्यांच्या घरपोच भाजीपाला पोहोचवण्यात येतो.

      सर्व भाजीपाल्याचे बारा महिन्याचे दर निश्चित केले आहे.काही भाजीपाला 20 रुपये प्रति पाव याप्रमाणे तर अद्रक आणि लसूण 30 रुपये प्रति पाव याप्रमाणे विक्री केली जाते. वर्षभर भाजीपाल्याची विक्री सुरू असते.शेतातून गाजर, पालक,मेथी, सांभार,शेपू,चवळी शेंगा,वांगी, घोळ, मिरची,टमाटर,बीट,मुळा,बरबटी, कांदा,लसूण,पालक,कोबी,अद्रक, दोडके व काकडीचे उत्पादन घेण्यात येते.सांभार,पालक,वांगी,काकडी, टमाटे व कोबी बारमाही उपलब्ध असते. स्ट्रॉबेरी,सिक्कीमची लाल चवळी, ब्रोकोली यासह अन्य काही  राज्यात व विदेशात होणाऱ्या भाजीपाल्यांचे देखील उत्पादन घेतल्याची माहिती संदीपने दिली.

         घरची दीड एकर शेती आणि शेजारची अडीच एकर शेती मागील दोन वर्षापासून पाच वर्षांसाठी 20 हजार रुपये हेक्टर याप्रमाणे भाड्याने घेऊन यामध्ये सुद्धा सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात येत आहे. नांगरणी आणि वखरणी अर्थात जमिनीची मशागत करून जमीन भाजीपाल्यासाठी तयार करून देण्याचे काम वडील दोन बैलांच्या साह्याने करून देतात.घरी तीन म्हशी, तीन बैल आणि तीन गीर गाई आहेत. या जनावरांपासून वर्षभरात 15 ते 20 ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. याच शेणखताच्या वापरातून सेंद्रिय शेती केली जाते.शेतातील विहिरीच्या पाण्यातून आणि पाईपलाईन टाकून दुसऱ्या विहिरीवरून भाड्याने पाणी घेऊन ठिबक आणि तुषार सिंचनातून शेतीतील भाजीपाला पिकांना पाणी देण्यात येते. 

      कोरोना काळात सप्टेंबर 2022 मध्ये लॉकडाऊन असताना कृषी विभागाच्या आत्मा कार्यालय परिसरात भाजीपाला विक्रीचा स्टॉल लावण्यास कृषी विभागांनी देखील प्रोत्साहन दिले. त्यामुळे कोरोना काळात देखील चांगल्या प्रकारे भाजीपाला विक्री करता आली. बिटोडा (तेली) येथील सदाशिव,देवीदास आणि संदीप या राऊत भावंडांचा अल्प शेतीतून विषमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा प्रयोग जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरला आहे. याच पाऊलवाटेने आता जिल्ह्यातील इतर शेतकरी विषमुक्त भाजीपाला या नगदी पिकाकडे वळू लागले आहेत.

 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे