कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेत बँकांची भूमिका महत्त्वाची मेघनाथ कांबळे कृती संगम कार्यशाळा

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेत बँकांची भूमिका महत्त्वाची 
                        मेघनाथ कांबळे 

कृती संगम कार्यशाळा 

वाशिम दि 16 (जिमाका) देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. केवळ शेतीवर अवलंबून राहून शेती न करता त्याला शेतीपूरक व्यवसायांची जोड देणे आवश्यक आहे.आज शेतीला मजुरांचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावत आहे.काढणी पश्चात सुविधा निर्माण झाल्या तर शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळेल. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासोबत शेतीपूरक व्यवसायाला गती देण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेत बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचे राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे यांनी केले.
             आज नियोजन समितीच्या सभागृहात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेवरील कृती संगम कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री. कांबळे बोलत होते.यावेळी मंचावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिनेश बारापात्रे,रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके, उपविभागीय कृषी अधिकारी निलेश ठोंबरे,कृषी विज्ञान केंद्र करडा येथील गृह विज्ञान विभागाच्या प्रा.शुभांगी वाटाणे,मत्स्य विकास अधिकारी श्रीमती जैन, पोकराचे विषय विशेषतज्ञ मिलिंद अरगडे,स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी संतोष वाळके व जिल्हा संसाधन व्यक्ती गोपाल मुठाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
             श्री कांबळे म्हणाले, कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव बँकांकडे सादर करावे. शेतकरी, बँक आणि शासन यांचा सुरेख कृती संगम या प्रकल्पातून होणार आहे.पोकरा, स्मार्ट व मॅग्नेट या योजना जिल्ह्यात राबविण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीतून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.या योजनेचा राज्यासाठी 8460 कोटी रुपयांचा लक्षांक दिला आहे. बँकांच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सन 2025 -26 पर्यंत द्यायचा आहे. कोरोना काळात सर्व क्षेत्र ठप्प झाले असल्याचे आपण बघितले.फक्त कृषी क्षेत्र हे एकमेव असे क्षेत्र आहे, जे कोणत्याही काळात थांबणार नाही. या योजनेचा कालावधी सन 2032- 33 पर्यंत आहे.कर्ज वितरण या योजनेतून सहा वर्षे करण्यात येणार आहे.तर कर्ज परतफेडीचा कालावधी हा सात वर्षाचा आहे.या योजनेअंतर्गत एका उद्योजकास /शेतकऱ्यास 29 प्रकल्पाचा लाभ घेता येईल असे त्यांनी सांगितले.
          बँकांनी शेतकऱ्यांना चांगली सेवा द्यावी,असे सांगून श्री कांबळे म्हणाले,स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर बँकांनी शेतकरी ग्राहकांना चांगली सेवा देणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी आता अवजार बँकेच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरणाचा वापर करून हार्वेस्टरसारख्या यंत्रांचा पीक कापणीसाठी उपयोग करावा. शेतीतील पीक काढण्यासाठी लागणारे विविध यंत्रे शेतकऱ्यांनी खरेदी करावी.काढणी पश्चात व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.मजुरांचा प्रश्न लक्षात घेता काढणी पश्चात व्यवस्थापन प्रकल्प राबविणे गरजेचे आहे.येणाऱ्या काळात मजुराऐवजी यंत्रांचा वापर करणे आवश्यक आहे. शेतीमध्ये भविष्यात यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे. रोबोट व यांत्रिक बैलाचा वापर करून शेतीची मशागत,रोवणी व कापणी आदि कामे होणार आहे.बाजाराची गरज लक्षात घेऊन जैविक शेतीची कास धरण्याचे आवाहन त्यांनी केले. 
              प्रास्ताविकातून बोलताना श्री तोटावर म्हणाले,वाशीम हा आकांक्षीत जिल्हा आहे. जिल्ह्यात उद्योगधंदे नाही. जिल्ह्याचा मुख्य उद्योग शेती हा आहे. कृषी मालावर प्रक्रिया करून उद्योग सुरू करण्यात येत आहे.स्मार्ट आणि पोकरासारख्या प्रकल्पातून शेतीला बळ मिळत आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी बँकांनी कर्ज देणे आवश्यक आहे.ही योजना एक महत्त्वपूर्ण योजना आहे. कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत, त्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव शेतकऱ्यांनी बँकाकडे दाखल करावे.परिपूर्ण प्रस्ताव बँकांकडे दाखल केल्यास बँका प्रस्ताव नाकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
           श्री. बारापात्रे यांनी बँकांची विविध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी सहकार्याची भूमिका राहणार असल्याचे सांगून, बँकासंदर्भात विविध अडचणी जाणून घेतल्या व त्याविषयी मार्गदर्शन केले.
           श्री. फडके यांनी आपल्या मार्गदर्शनातून रेशीम शेतीसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. 
         श्रीमती जैन यांनी मत्स्य व्यवसाय विभागाच्या विविध योजनांची,मासळीपासून निर्माण होणाऱ्या विविध खाद्यपदार्थाची माहिती दिली.बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मासळीची होणारी मागणी व पुरवठा याबाबतची माहिती देऊन मासळी व्यवसायाचे महत्त्व विशद केले.
       कार्यशाळेला जिल्ह्यातील कृषी विभागाचे सर्व तालुका कृषी अधिकारी,तंत्र अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी, जिल्ह्यातील विविध कृषी योजनेअंतर्गत असलेले लाभार्थी शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी,शेतकरी उत्पादक गट व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी केले. आभार सहाय्यक तंत्र व्यवस्थापक संजय राऊत यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे