शेती शाळेतून दिली पीक लागवड तंत्रज्ञान ते पीक कापणीची माहिती 255 शेतीशाळेतून 7 हजार 650 शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शेती शाळेतून दिली पीक लागवड तंत्रज्ञान ते पीक कापणीची माहिती 

255 शेतीशाळेतून 7 हजार 650 शेतकऱ्यांना मार्गदर्शन 

वाशिम दि.28 (जिमाका) जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर केली जाते.काही शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतावरून संरक्षित सिंचनाची व्यवस्था करतात. जिल्ह्यात सोयाबीन हे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते.कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती पद्धतीला छेद देऊन आधुनिक पद्धतीने कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी व त्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घ्यावे हा शेतीशाळेमागचा उद्देश आहे. सन 2022 - 23 या वर्षात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करून पिकाचे लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापन ते पीक काढणीबाबतच्या खरीप आणि रब्बी हंगामात एकूण 255 शेतीशाळा घेण्यात आल्या. या शेती शाळेमध्ये कृषी विभागाच्या अधिकारी व कृषी सहायकांनी 7 हजार 650 शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
       खरीप हंगामात 174 शेतीशाळा घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असता 159 शेती शाळा घेण्यात आल्या. यामध्ये 4 हजार 770 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या शेतीशाळेतून शेतकऱ्यांना कीड व्यवस्थापन बीज प्रक्रिया याबाबतची माहिती देऊन घेण्यात येणाऱ्या पिकांच्या वेळेनुसार तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. 
            खरीप हंगामातील शेती शाळेतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीन पिकांच्या 13,राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत तूर पिकाच्या 15, राज्य पुरस्कृत मूल्य साखळी योजनेअंतर्गत सोयाबीन पिकाच्या 20, कापूस पिकाच्या 8, पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अर्थात क्रॉप सॅप अंतर्गत तुर पिकाच्या 3,पोकरा योजनेअंतर्गत सोयाबीन आणि कापूस पिकांच्या 68,आत्माअंतर्गत सोयाबीन,तूर,रेशीम,हळद,जीरानियम, सेंद्रिय तुर, भाजीपाला,संत्रा कापूस, कृषी प्रक्रिया आणि सेंद्रिय निविष्ठा अंतर्गत 32 शेती शाळा घेण्यात आल्या.
     रब्बी हंगामात हरभरा पिकाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत 14, आत्मा अंतर्गत 10, पोकरा अंतर्गत 31, क्रॉप सॅपच्या 12 अशा एकूण 67 शेती शाळा घेण्यात आल्या. रब्बी ज्वारीच्या 2 आणि आत्माअंतर्गत इतर पिकांच्या 11 शेतीत शाळा घेण्यात आल्या. 
             शेतीविषयक पिकांची लागवड,कीड व्यवस्थापन,आंतर मशागतीची, बीज प्रक्रियांची माहिती शेतकरी महिलांना व्हावी तसेच कृषी क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने पुढे याव्यात यासाठी यावर्षीच्या रब्बी हंगामात महिलांसाठी 16 शेती शाळा  घेण्यात आल्या. यातील एक शेती शाळा राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, 7 शेती शाळा आत्मा,5 शेती शाळा पोकरा आणि तीन शेती शाळा क्रॉप सॅप अंतर्गत घेण्यात आल्या.
          खरीप हंगामात वाशिम तालुका - 14, रिसोड तालुका - 24, मालेगाव तालुका - 15,मंगरूळपीर तालुका - 17, मानोरा तालुका - 61 आणि कारंजा तालुक्यात 25 अशा एकूण 159 शेती शाळा घेण्यात आल्या. कृषी विभागाचे तज्ञ अधिकारी ते कृषी सहायक यांनी वरील दोन्ही हंगामातील कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करून पिकाचे लागवड तंत्रज्ञान एकात्मिक कीड व्यवस्थापन ते पीक कापणीबाबतचे मार्गदर्शन केले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना तसेच शेती शाळेला उपस्थित शेतकऱ्यांकडून इतर शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी या शेती शाळेचा निश्चितच उपयोग होणार आहे.शेती शाळेमुळे पीक उत्पादनात वाढ होण्यास देखील मदत होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे