आजपासून इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग सुरु
- Get link
- X
- Other Apps
आजपासून इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग सुरु
वाशिम, दि. 09 (जिमाका) : जिल्हयात कोरोना व ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग कमी होत असल्यामुळे आज 10 फेब्रुवारीपासून जिल्हयातील इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग ऑफलाईन पध्दतीने प्रत्यक्षरित्या सुरु ठेवण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिले आहे. शासनाने राज्यातील शाळा व महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्देश यापूर्वी दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी 31 जानेवारी 2022 नुसार जिल्हयातील इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा तसेच सर्व अकृषी विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, समूह विद्यापीठे, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग 1 फेब्रुवारी 2022 पासुन प्रत्यक्षरित्या सुरु ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
जिल्हयात लसीकरणाच्या पहिल्या डोसची टक्केवारी 80.46 टक्के व दुसऱ्या डोसची टक्केवारी 59.36 टक्के इतकी आहे. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शैलेश हिंगे यांनी साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार जिल्हयातील विद्यार्थ्यांकरीता नियमीतरित्या शाळा ऑफलाईन पध्दतीने सुरु ठेवणे विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील. या आधीच इयत्ता 9 वी पासुन महाविद्यालयासह शाळा सुरु करण्यात आल्या होत्या, त्यासोबतच आता इयत्ता 1 ली पासुनच्या शाळा आज 10 फेब्रुवारी 2022 पासुन प्रत्यक्षरित्या सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहे.
जिल्हयातील सुरु होणाऱ्या सर्व शाळा/महाविद्यालये यांनी कोविड-19 च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश, कामांच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निर्देश, राज्य शासनाने वेळोवळी काढलेली मार्गदर्शक तत्वे किंवा मानके कार्य प्रणाली निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचना लागू राहतील. ज्या विद्यार्थी/ विद्यार्थीनींचे वय 14 वर्षापेक्षा जास्त आहे परंतू कोविड-19 ची लस घेतलेली नाही, त्यांच्याकरीता शाळा/ महाविद्यालय संबंधित संस्थांचे प्रमुख/मुख्याध्यापक यांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने पुर्ण करुन घ्यावे. तसेच शाळा/महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करुन घ्यावे.
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 14 फेब्रुवारीपर्यंत आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यास ताप, सर्दी, खोकला असल्यास शाळेत येण्याबाबतची बंदी घालण्यात येईल. विद्यार्थ्यास शाळेमध्ये येण्याबाबत त्यांचे पालकांचे संमतीपत्र घेणे शाळेला बंधनकारक राहील. पालकांनी संमती नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने शैक्षणिक वर्ग सुरु ठेवण्यात यावे. मैदानावरील खेळ, स्नेह-संमेलने, दैनिक परिपाठ यांसारख्या गर्दीच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी राहील. विद्यार्थ्यांच्या पालकांचे 100 टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने पालकांना प्रोत्साहन देवून जनजागृती करण्यात यावी. शाळा/महाविद्यालये परिसरातील गर्दी टाळण्यासाठी पालकांचा शाळेच्या परिसरातील प्रवेश टाळण्यात यावा. कोविड-19 प्रतिबंधात्मक त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. शाळा/महाविद्यालये परिसरात शालेय कर्मचाऱ्यांसह सर्वांना मास्क वापरण्याची सक्ती करण्यात यावी. विद्यार्थ्यांचे नाक, तोंड नियमित मास्क ने झाकलेले असावे. विदयार्थी मास्क ची अदलाबदल करणार नाहीत याची दक्षता घ्यावी. शालेय परिसराची नियमीत स्वच्छता राखण्यात यावी. वेळोवेळी शाळेचे नियमित निर्जंतुकीकरण करण्यात यावे. विदयार्थ्यांना सुध्दा वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागरुक करण्यात यावे. विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी साबणाने हात धुण्यासाठी स्वंतत्र व्यवस्था करण्यात यावी. विदयार्थ्यांना सोबत पाणी बॉटल आणण्यासाठी प्रोत्साहीत करावे.
कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शाळांमध्ये बायोमॅट्रीक उपस्थितीचा वापर करण्यात येवू नये. विद्यार्थ्यांनी कोणतेही साहित्य जसे की, पुस्तक, पेन, पेन्सील, पाणी बॉटल शाळेत येतांना सोबत आणावे. त्यांची आपसात अदलाबदल करु नये याबाबत दक्षता घ्यावी. एका बाकावर शक्यतो एकच विदयार्थी बसेल याची खबरदारी घ्यावी. तसेच दोन बाकांमध्ये सुरक्षीत अंतर राखण्यात यावे. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व इतर पर्यवेक्षकीय यंत्रणेने शाळांना नियमीत भेटी देवून, निर्देशित नियमानुसार शाळा सुरु असल्याबाबतची वेळोवेळी खात्री करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005 मधील कलमानुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल. व संबधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात यईल. हा आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 च्या तरतुदीनुसार लागू करण्यात आला असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी कळविले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment