घरकुलाच्या लाभार्थ्यांनी आमिषाला बळी पडू नये *जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे आवाहन
*घरकुलाच्या लाभार्थ्यांनी आमिषाला बळी पडू नये*
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे आवाहन
वाशिम दि.२६(जिमाका)जिल्ह्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या विविध घटकातील पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल मिळवून देण्याचे काम पंतप्रधान आवास योजना,रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे.ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहे,केवळ त्यांनाच पासबुक व जॉब कार्डची झेरॉक्स प्रत, जागेचा आठ -अ ,100 रुपयांचा बॉण्ड पेपर आदी कागदपत्रांची मागणी पंचायत समितीकडून संबंधित गावच्या ग्रामसेवकाला करण्यात येत आहे. त्यामुळे घरकुलाच्या पात्र लाभार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. घरकुल लवकर मंजूर करून देतो असे कोणी सांगून पैशाची मागणी करीत असतील तर आर्थिक व्यवहार करू नये.तसेच कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.याबाबत संबधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना तातडीने कळवावे.असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील निकम यांनी केले आहे.
सन २०१८ मध्ये विविध घटकातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले. जे लाभार्थी सन २०११ च्या सामाजिक, आर्थिक व जातगणनेतून वंचित होते त्यांनी व नवीन लाभार्थ्यांनी घरकुल मिळण्यासाठी अर्ज करायचे होते. त्यासाठी पंचायत समिती स्तरावर ऑपरेटर व प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली होती.संबंधित ॲपवर लाभार्थ्यांची माहिती व फोटो अपलोड करायचे होते. सन २०११ च्या तेरा निकषानुसार जिल्ह्यातील २६ हजार ८३९ अर्ज संबंधित संगणक प्रणालीने रद्द केले. त्यानंतर पात्र व अपात्र अर्जदारांची यादी ऑगस्ट २०२१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. या यादीतील काही पात्र लाभार्थी आहेत जे गावांमध्ये राहत नाही, बाहेरगावी राहण्यासाठी गेले आहेत तसेच त्यांचा मृत्यू झाला आहे अशांना वगळून पुन्हा अद्ययावत पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित ग्रामपंचायतला लावण्यात आली आहे.आतापर्यंत जॉब कार्ड मॅपिंग ९९.६५ टक्के झाले आहे.
पंचायत समितीस्तरावरून पात्र ठरलेल्या अर्जदारांच्या घरांना भेटी देण्यात आल्या. या फेरतपासणीला नोव्हेंबर २०२१ पासून सुरुवात झाली. या तपासणीत आणखी काही अर्जदार अपात्र ठरले.त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेसमोर ठेवण्यात आली. जे लाभार्थी अपात्र ठरले ती यादी प्रसिद्ध करण्यात आली.प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर आक्षेप मागविण्यात आले. पंचायत समितीस्तरावर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली यावर निर्णय घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली. ही समिती या आक्षेपावर निर्णय घेऊन त्यानंतर ही समिती पात्र व अपात्र अर्जदारांची प्रकरणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीकडे पाठविणार आहे.
सन २०२१-२२ या वर्षात पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी ८ हजार ९७० घरकुलांचे,रमाई आवास योजनेअंतर्गत २ हजार आणि शबरी आवास योजनेअंतर्गत ३१९ घरकुलांचे देण्यात आले आहे. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे करण्यात येत आहे.जे पात्र ठरलेले लाभार्थी आहेत त्यांना येत्या पाच वर्षात प्राधान्यक्रमानुसार घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी कोणी जर घरकुल लवकर मंजूर करून देतो असे सांगत असेल तर त्याच्या भूलथापांना बळी पडू नये.तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन श्री निकम यांनी केले आहे.
Comments
Post a Comment