काटा येथील अल्पवयीन मुलीचा

बालविवाह रोखण्यात यश

             वाशिम, दि. २5 (जिमाका) : जिल्हयातील वाशिम तालुक्यातील काटा या गावात आज २५ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १२ वाजता बालविवाह होत असल्याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक धर्मराज चव्हाण, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आलोक अग्रहरी यांना अगदी वेळेवरच प्राप्त झाली होती. त्यामुळे हा बालविवाह थांबविण्याचे मोठे आवाहन जिल्हा प्रशासनापुढे होते. ताबडतोब संपूर्ण यंत्रणा कामी लावून ऐन वेळेवर हा बाल विवाह थांबविण्यात प्रशासनास यश मिळाले.

                 वाशिम येथून अवघ्या 5 किमी अंतरावर असलेल्या काटा या गावी एका 14 वर्षीय बलिकेचा बालविवाह लावून देण्यात येणार असल्याची गुप्त माहिती चाईल्ड हेल्प लाईनवर प्राप्त झाली होती. वेळ अगदी कमी होता आणि एक निरागस अल्पवयीन बालिकेच्या आयुष्याचा प्रश्न होता. एका तासभरात सर्व प्रक्रिया पूर्ण करायची होती. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आलोक अग्रहरी यांनी लगेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईन वाशिमचे अधिकारी यांना पथकासह घटनास्थळी जाऊन बाल विवाह थांबविण्याचे आदेश दिले. तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील विशेष महिला सुरक्षा अधिकारी सुनिता इथापे, वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश झळके यांना माहिती दिली. त्यांनी ताबडतोब पोलीस पथक काटाकडे रवाना केले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी, संरक्षण अधिकारी संस्था बाहय लक्ष्मी काळे, रमेश वाघ, रामेश्वर वाळले, एकनाथ राठोड चाइल्ड लाइनचे सदस्य अविनाश चौधरी, अविनाश सोनूने, वाशीम ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मच्छळे, पोलीस काँस्टेबल प्रशांत अंभोरे यांनी काटा गाव गाठले. गाव ग्राम बाल समितीचे सदस्य ग्रामसेवक दशरथ राठोड, अंगणवाडी सेविका बेबीनंदा लगड, सरपंच रामकिसन मोरे, उपसरपंच नितीन खडसे सोबत चर्चा करून जेथे बालविवाह होणार आहे त्यांच्या घरी जाऊन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांना कायदेविषयक माहिती देण्यात आली. समुपदेशनामुळे बालविवाह रोखण्यात आला. लग्न 18 वर्षे पूर्ण झाल्यावरच मुलीचे करणार असे हमीपत्र मुलीच्या पालकांकडून लिहून घेण्यात आले. याकामी वाशिम जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा सचिव वासुदेव सोनोने यांचे सहकार्य लाभले. जिल्हयात अशाप्रकारे जर कुठेही बालविवाह होत असेल तर ते रोखण्यासाठी त्या गावातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असलेले ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका तसेच चाइल्ड लाइनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी आलोक अग्रहरी यांनी दिली आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे