*पालक सचिवांनी घेतला मग्रारोहयोचा आढावा*

*पालक सचिवांनी घेतला मग्रारोहयोचा आढावा*

वाशिम दि.१२(जिमाका) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव श्री. नंदकुमार यांनी आज १२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृह येथे जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मिठेवाड, जिल्हा जलसंधारण अधिकारी( जि.प) श्री. मापारी, सार्वजनिक बांधकाम विभाग( जि.प) अधिकारी अभियंता श्री खारोडे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ व जिल्हा रेशीम विकास अधिकारी अरविंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          श्री नंदकुमार यावेळी म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ६० टक्के कामे ही वैयक्तिक लाभाची झाली पाहिजे. वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या माध्यमातून मनुष्य दिवस निर्मिती होण्यास मदत होईल. जिल्ह्यात रोहयोची जी कामे अपूर्ण आहेत, ती तातडीने पूर्ण करावी. लोक लखपती व्हावे यासाठी मनरेगातून कामे करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून तूती लागवडीकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांना श्रीमंत होण्याचा हा एक मार्ग आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी हा लखपती झाला पाहिजे. गटविकास अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून कामे करावी.त्यामुळे ग्रामीण कुटुंब समृद्ध होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
          जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धान्याची साठवणूक करण्यासाठी धान्य साठवणुकीची गोदामे तयार करण्याचे नियोजन करण्यात यावे, असे सांगून श्री.नंदकुमार पुढे म्हणाले, वैयक्तिक लाभाच्या योजनेतून गोठ्यांची कामे पाळीव व दुधाळ जनावरांसाठी झाली पाहिजे.गोदामे, रस्ते व गोठयांची  लोकांना आवश्यकता आहे.या कामांबाबत गावकऱ्यांशी चर्चा झाली पाहिजे. ही कामे करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. इथला शेतकरी हा लखपती व्हावा यासाठी पीक पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे. एक चांगली बाब म्हणजे इथला शेतकरी फळबाग लागवडीकडे वळत आहे.शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
       श्री नंदकुमार पुढे म्हणाले,ज्या व्यक्तींना जॉब कार्डची आवश्यकता आहे, त्याबाबत नियोजन करून त्यांना जॉबकार्ड देण्यात यावे.पाच एकरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना देखील जॉब कार्ड द्यावे.मनरेगातून अकुशल कामे वाढली पाहिजे. नियोजन केल्यानंतर पुढील १५ दिवसात मनरेगाची कामे कोणत्याही परिस्थितीत सुरू झाली पाहिजे.मनरेगाची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. त्यामुळे कामे वेगाने सुरू करून वेगाने पूर्ण करता येतील. शेतीच्या उत्पादित मालासाठी बाजारपेठ निर्माण झाली पाहिजे. गावातील प्रत्येक कुटुंब कसे लखपती होईल या दृष्टीने यंत्रणांनी काम करावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
              श्री.षण्मुगराजन म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढली पाहिजे. सोयाबीनचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. बीबीएफ व अमरपट्टा पद्धतीतून सोयाबीनचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यात येत आहे. मार्चपासून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले.
              श्रीमती पंत म्हणाल्या, मनरेगाशी संबंधित यंत्रणांची दर महिन्याला नियमित सभा घेण्यात येईल.मालेगाव व मानोरा तालुक्यातील काही गावांना केंद्रित करून काम सुरू केले आहे. यामध्ये गावाच्या ग्रामसभेला विश्वासात घेऊन काम करण्यात येत आहे. पुढील दहा वर्षाचे नियोजन करण्यात येईल. प्रत्येक कुटुंब मनरेगातून लखपती झाले पाहिजे या दृष्टीने काम करण्यात येत आहे. मनरेगाच्या कामातून कुटुंब समृद्ध झाली पाहिजे असे नियोजन असल्याचे त्याने सांगितले.
               यावेळी श्री हिंगे यांनी जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची माहिती दिली.जिल्ह्यात मग्रारोहयोची ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावरील एकूण ५३९ कामे सुरू आहे.यावर ४ हजार ६ मजूर काम करीत आहे. १० फेब्रुवारीपर्यंत सन २०२१-२२ या वर्षातील कामातून ५ लाख ४७ हजार ७७० मनुष्य दिवस निर्माण झाले. जिल्हास्तरीय यंत्रणांच्या ९९१ कामातून ५ लक्ष ६२ हजार २०० मनुष्य दिवस निर्मिती अपेक्षित आहे. जिल्ह्यातील ३६३ ग्रामपंचायतीचे २३४९ कामांचे मातोश्री पांदण रस्त्यासाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले आहे. सन २०२२-२३  चा समृद्धी बजेटचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले.
             या सभेला सर्व गटविकास अधिकारी,संबंधित यंत्रणांचे अधिकारी व रोहयोचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.

Comments

  1. माझ्या गावामध्ये मी जेव्हा माझे शिक्षण पूर्ण करून इथे आलोय तेंव्हा इथची समस्या पाहुन फार दुःख होत की ज्या शासनाच्या योजनांचा लाभ माझ्या गावच्या गोरगरीब मजुरांना व्हायला पाहिजे होता ते फक्त काही अधिकारी आणि राजकारणी लोकांमुळे आणि त्यांच्या ब्राष्टाचारा मुळे मोठे नुकसान होत आहे...जेंव्हा मी जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद याना तक्रार केलीय पण अद्याप कोणतीही चौकशी नाही ..आमच्या सारख्या गावात राहणाऱ्या लोकांच्या नशिबी हेच आहे का? का आमच्या तक्रारीची दखल घेण्यात येत नाहीय?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे