इयत्ता ९ वी ते १२ वी तसेच सर्व महाविद्यालये आजपासून सुरू · प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक · सर्वांना मास्क वापरण्याची सक्ती · दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश

इयत्ता ९ वी ते १२ वी तसेच सर्व महाविद्यालये आजपासून सुरू

                                ·       प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक

                                ·       सर्वांना मास्क वापरण्याची सक्ती

                                ·       दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश


वाशिम, दि. ०१ (जिमाका) : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीचा विचार करून इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी चे तसेच सर्व महाविद्यालये, तंत्रनिकेतन तसेच तत्सम शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग आज १ फेब्रुवारीपासून ऑफलाइन पद्धतीने सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचे प्रत्येकांना पालन करावे लागेल. तसेच सर्वांना मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. दोन्ही कोविड लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच शाळा/महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे.असे या आदेशात नमूद केले आहे. कोविड-१९ व्यवस्थापनाबाबत दिलेले निर्देश, कामाच्या ठिकाणाबाबतचे अतिरिक्त निर्देश, शासनाने वेळोवेळी काढलेले मार्गदर्शक तत्वे तसेच विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन शाळा-महाविद्यालयांना करावे लागणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी कोविड -१९  लसीचे दोन डोस घेतले आहे, अशांनाच प्रत्यक्ष संस्था/महाविद्यालयात उपस्थित राहता येईल. ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कोविड-१९ लस घेतलेली नाही अशा संस्था /महाविद्यालयाच्या प्रमुख/ प्राचार्यांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणाची विशेष मोहीम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करावे.३१ जानेवारी २०२२ पर्यंत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर टी -पीसीआर चाचणी झालेली असावी.

शाळा/महाविद्यालये दररोज किमान तीन ते चार तास कालावधीसाठी घेण्यात यावी. विद्यार्थ्यास ताप,सर्दी व खोकला असल्यास शाळेत येण्यास त्याला बंदी घालावी. विद्यार्थ्यास शाळेमध्ये येण्याबाबतची त्याचे पालकांचे संमतीपत्र घेणे शाळेला बंधनकारक राहील. पालकांनी संमती नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शैक्षणिक वर्ग सुरू ठेवावे. मैदानावरील खेळ, स्नेहसंमेलने व दैनिक परिपाठ यासारख्या गर्दीच्या कार्यक्रमांच्या आयोजनात बंदी राहील.

विद्यार्थ्यांच्या पालकांचे १०० टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने पालकांना प्रोत्साहन देऊन जनजागृती करण्यात यावी. शाळा/ महाविद्यालयांच्या परिसरात गर्दी टाळण्यासाठी पालकांचा शाळेच्या परिसरातील प्रवेश पाळण्यात यावा. कोविड -१९ प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. शाळा परिसर शालेय कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच मास्क वापरण्याची सक्ती करण्यात यावी. विद्यार्थ्यांचे नाक तोंड नियमित मास्कने झाकलेले असावे. शाळेच्या परिसराची नियमित स्वच्छता राखणे, वेळोवेळी शाळांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्यात यावे. विद्यार्थ्यांना सुद्धा वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागृत करण्यात यावे. विद्यार्थ्यांसाठी साबणाने हात स्वच्छ धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी.

विद्यार्थ्यांना सोबत पाणी बॉटल आणण्यासाठी प्रोत्साहित करावे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितीचा वापर करण्यात येऊ नये. विद्यार्थ्यांनी कोणते साहित्य जसे पेन,पेन्सिल, पुस्तक, पाणी बॉटल शाळेत येताना सोबत आणावी. एका बाकावर शक्यतो एकच विद्यार्थी बसेल याची खबरदारी घ्यावी तसेच दोन बाकामध्ये सुरक्षित अंतर राखण्यात यावे.

विद्यापीठे/ महाविद्यालयांच्या १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्या. त्यानंतर घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑफलाईन/ ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. विजेची अनुपलब्धता किंवा नेटवर्क कनेक्टिविटी नसल्यास किंवा विद्यार्थी अथवा त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित असल्यास किंवा आरोग्याच्या इतर समस्यांमुळे विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्यांची ऑनलाइन/ ऑफलाइन पद्धतीने पुनर्परीक्षा घेण्यात यावी. परीक्षेपासून कोणीही कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठ/ महाविद्यालयांनी हेल्पलाइनची व्यवस्था करावी. परीक्षा व्यवस्थितरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच, हेल्पलाइन नंबर इत्यादी माहिती स्वयंस्पष्ट उपलब्ध करून द्यावी. विद्यापीठ/महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व इतर पर्यवेक्षीय यंत्रणा यांनी शाळांना नियमित भेटी देऊन निर्देशित नियमानुसार शाळा सुरु असल्याबाबतची वेळोवेळी खात्री करावी. तसेच त्याबाबतचा अहवाल शिक्षणाधिकारी(प्राथमिक) यांच्याकडे सादर करावा.

या आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.हा आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ च्या तरतुदीनुसार जिल्ह्यात लागू करण्यात येत आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे