लसीकरणासाठी टिम वर्क म्हणून काम करा - षण्मुगराजन एस. *मानोरा येथे लसीकरण आढावा सभा*

लसीकरणासाठी टिम वर्क म्हणून काम करा
                          - षण्मुगराजन एस. 

*मानोरा येथे लसीकरण आढावा सभा*

वाशिम दि.9 (जिमाका) जिल्ह्यात मानोरा तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण सर्वात कमी आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्णपणे आजही गेलेला नाही.कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केव्हा येईल हे सांगता येणार नाही. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस घेणे हा एकमेव उपाय आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत तालुक्यातील  पहिल्या डोससाठी पात्र असलेल्या व्यक्तींचे शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे.असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
          आज 9 नोव्हेंबर रोजी मानोरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मानोरा तालुक्याचा कोरोना लसीकरण आढावा घेताना आयोजित सभेत श्री.षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश आहेर, प्रभारी तहसीलदार श्री. किर्दक गटविकास अधिकारी श्री. पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          श्री. षण्मुगराजन म्हणाले, ज्या गावांचे लसीकरण प्रमाण कमी आहे, त्या गावांना विकास निधी व शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार नाही. यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर जाऊन प्रत्यक्ष झालेले लसीकरण आणि बाकी असलेल्या लसीकरणाबाबतची माहिती घ्यावी. ज्यांचे अद्यापही लसीकरण करण्यात आलेले नाही, त्यांच्याशी संपर्क करून त्यांना लस घेण्यास सांगावे व त्यांनी लाच घेतल्याची खात्री करावी. लसीकरणाचे प्रमाण कमी आहेत अशा गावातील सरपंच व पोलिस पाटील यांनी पुढाकार घेऊन 30 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करावे. गावपातळीवर काम करणारे शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांनी गावातील पात्र व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. असे त्यांनी सांगितले.
       लसीकरणासाठी सहकार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगून श्री.षण्मुगराजन म्हणाले, गावातील लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे ही देखील आपली जबाबदारी आहे.लसीकरणासाठी जे कर्मचारी गावपातळीवर सहकार्य करणार नाही त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. सुरुवातीला लसीकरणाला लोकांनी प्रतिसाद दिला नाही.त्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिल्यावर त्यांचेही मन परिवर्तन होऊन आज ते सुद्धा लस घेत आहे. अनेकांचे लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यात आल्याने त्यांनी देखील लस घेतल्याचे ते म्हणाले.
               श्री. निकम म्हणाले, गावपातळीवरील लसीकरणाबाबतची कर्मचाऱ्यांची असलेली उदासीनता दूर करून त्यांनी येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत पहिला डोसचे 100 टक्के लसीकरण करावे. बाहेरगावी असलेल्या लोकांशी संपर्क करून लस घेतल्याची खात्री करावी. बाहेरगावावरून परत गावात आलेल्या व्यक्तींचे लसीकरण करावे. यापूर्वी आलेल्या दोन कोरोना लाटेची दाहकता सर्वांनी अनुभवली आहे. अनेकांना आपले जवळचे नातेवाईक गमावण्याची वेळ आली. त्यामुळे गांभीर्याने लसीकरणाचे काम करावे आणि तेवढ्याच गांभीर्याने लोकांनी सुद्धा लस घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
     डॉ.आहेर म्हणाले, सर्वात कमी लसीकरण मानोरा तालुक्यात झाले आहे.संभाव्य कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरणाबाबत कोणतेही गैरसमज न करता लसीकरण केंद्रावर जाऊन जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी लस घ्यावी. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
             मानोरा तालुक्यात 8 नोव्हेंबरपर्यंत पहिला डोस 67 हजार 846 व्यक्तींनी आणि दुसरा दिवस 32 हजार 401 व्यक्तींनी घेतला. एकूण 1 लाख 247 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. पहिला डोस 68 टक्के आणि दुसरा डोस 32.51 टक्के व्यक्तींनी घेतला.सभेला मानोरा तालुक्यातील सरपंच,उपसरपंच, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, मंडळ अधिकारी, तलाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व आशा सेविका उपस्थित होत्या.ज्या गावांचे लसीकरण कमी प्रमाणात झाले आहे,त्याबाबतची माहिती संबंधित गावचे सरपंच,पोलीस पाटील,तलाठी,अंगणवाडी सेविका यांच्याकडून घेण्यात आली.यावेळी सर्वाधिक लसीकरण झालेल्या कारखेडा येथील सरपंच, तलाठी, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांचा पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे