योग्य नियोजन व समन्वयातून लसीकरण पुर्ण करा
-षण्मुगराजन एस.
तालुका यंत्रणांचा व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा
वाशिम, दि. 15 (जिमाका) : कोविड लसीकरणासाठी काम करणाऱ्या तालुका पातळीवरील यंत्रणांनी येत्या 30
नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी तालुका पातळीवर योग्य
नियोजन व समन्वयातून काम करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी
दिले.
आज 15 नोव्हेंबर रोजी व्हिडीओ
कॉन्फरन्सच्या माध्यमातून तालुका यंत्रणांचा कोविड लसीकरण आढावा घेतांना श्री.
षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल
निकम, नोडल अधिकारी असलेले अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार (मानोरा), निवासी
उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे (मालेगांव), उपजिल्हाधिकारी संदीप महाजन (कारंजा),
सुनील विंचनकर (रिसोड), सुवासिनी गोणेवार (वाशिम) तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
अविनाश आहेर, प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर, शिक्षणाधिकारी
(प्राथमिक) रमेश तांगडे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे व
उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. षण्मुगराजन म्हणाले,
कोणत्याही परिस्थितीत कोविड लसीकरण पुर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, तलाठी,
ग्रामसेवक व शिक्षक यांनी गावपातळीवर माहिती घेवून गावातील कोणत्या व्यक्तींनी
एएनएमचे प्रशिक्षण घेतले आहे व ती व्यक्ती गावात आहे याबाबतची माहिती घ्यावी. त्या
व्यक्तीला लसीकरण मोहिमेसाठी मानधन तत्वावर घेता येईल. त्यामुळे संबंधित तालुक्यात
लसीकरण टिम वाढविण्यास मदत होईल. सर्व तालुकास्तरीय यंत्रणांनी दोन दिवसात शोध घेवून
एएनएम प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करावी. ज्या गावामध्ये लसीकरण
केंद्र आहे त्या गावात सकाळी 8 वाजता लसीकरणाला सुरुवात झाली पाहिजे, त्यामुळे
शेतकरी व मजूर वर्गाला लस घेवून शेतीच्या कामाला जाता येईल. ज्या गावात लोकसंख्या
जास्त आहे, त्या गावात प्राधान्याने लसीकरण पुर्ण करण्यात यावे. असे ते म्हणाले.
ज्या गावातील जास्तीत जास्त
व्यक्तींचे लसीकरण प्रलंबित आहे, त्यांचे लसीकरणासाठी नियोजन करावे असे सांगून
श्री. षण्मुगराजन म्हणाले, गावपातळीवर आशा कार्यकर्तीकडे असलेल्या यादीनुसार
प्रलंबित व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे. प्रत्यक्षात लसीकरण करण्यात
आलेल्या व्यक्तींची संख्या आणि डेटा एन्ट्रीमध्ये जी तफावत आहे ही तातडीने दूर
झाली पाहिजे. लस वाया जाणार नाही यासाठी व्यवस्थित लस वापरावी. लसीकरणासाठी
प्रोत्साहित करणारे लोकप्रतिनिधी, धर्मगुरु व समाजातील मान्यवर व्यक्तींची लसीकरण
पुर्ण करण्यासाठी मदत घ्यावी. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण होण्यास मदत होईल.
ज्यांनी लस घेतली पण त्यांची नोंद ऑनलाईन झालेली नाही त्यांचा शोध घेवून नोंद
घ्यावी. रेशन दुकानामध्ये सुध्दा लसीकरण शिबीर आयोजित करावे. असे श्री. षण्मुगराजन
यांनी सांगितले.
श्री. निकम म्हणाले, 30
नोव्हेंबरपर्यंत पहिला डोस पुर्ण करायचा आहे. नियोजनानुसार लसीकरण केंद्र सुरु
राहत नाही. लसीकरण करणारी चमू संबंधित गावात 7 वाजता पोहचली पाहिजे. त्यामुळे लोक
लस घेवून शेतीच्या कामाला जातील. तालुका आरोग्य अधिकारी यांनी लसीकरणासाठी योग्य
समन्वय ठेवावा. नियोजनानुसार लसीकरणाचे काम होत नाही ही वास्तविकता आहे. ज्या गावी
सर्वात जास्त लसीकरण करणे बाकी आहे, त्या गावामध्ये लसीकरण चमू पाठविण्यात यावी व
तेथे पुर्ण लसीकरण करण्यात यावे. प्रलंबित असलेली डेटा एन्ट्री अद्यावत करुन
घ्यावी. असे त्यांनी सांगितले.
डॉ. आहेर म्हणाले, 8 ते 14
नोव्हेंबर दरम्यान 57 हजार व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. या लसीकरणावरुन
कामात दिरंगाई व संतपणा दिसून येतो. जिल्हयात ज्यांचे लसीकरण झाले त्यापैकी
काहींची डेटा एन्ट्री झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थीतीत डेटा एन्ट्री
करणे गरजेचे आहे. जिल्हयात लसीकरणासाठी पात्र असलेल्या 9 लाख 82 हजार 300
व्यक्तींपैकी पहिला डोस 6 लाख 22 हजार 608 व्यक्तींनी आणि दुसरा डोस 3 लाख 53 हजार
748 व्यक्तींनी घेतला आहे. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 63.38 टक्के आणि दुसऱ्या
डोसचे प्रमाण 36.01 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तालुक्यासाठी नियुक्त
केलेल्या नोडल अधिकारी यांनी लसीकरणा दरम्यान दिसून आलेल्या त्रृटी व अडचणीबाबतची
माहिती यावेळी दिली. सभेत सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी,
तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी व गटशिक्षणाधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या
माध्यमातून सहभागी होते.
*******
Comments
Post a Comment