महिला अत्याचार निर्मूलन दिनानिमित्त* पोलिस अधीक्षकांनी घेतला वर्षभरातील महिला हिंसाचार रोखण्याच्या कामगिरीचा आढावा

*महिला अत्याचार निर्मूलन दिनानिमित्त* 
पोलिस अधीक्षकांनी घेतला वर्षभरातील महिला हिंसाचार रोखण्याच्या कामगिरीचा आढावा 

वाशिम दि.26(जिमाका) 25 नोव्हेंबर हा दिवस जगभर संयुक्त राष्ट्र महासंघाच्या सूचनेनुसार आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून 25 नोव्हेंबर रोजी आयोजित आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांनी जिल्ह्यातील महिला हिंसाचार रोखण्याच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी श्री. खंडेराव, महिला तक्रार निवारण कक्ष प्रभारी, निर्भया पथकाचा पोलीस उपनिरीक्षक धोंगडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
              जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला तक्रार निवारण कक्ष जिल्हास्तर आणि पोलीस स्टेशन स्तरावर कार्यरत आहे. महिलांच्या प्राप्‍त तक्रारींची दखल घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात येते. तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यास मदत करण्यात येते. सन 2021 मध्ये आतापर्यंत 259 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 54 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून उर्वरित प्रकरणी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती संबंधित अधिकार्‍याने यावेळी दिली. 
         जिल्ह्यातील महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक कार्यान्वित आहे. हरविलेल्या व बेपत्ता मुले, मुली व महिलांचा शोध घेण्यासाठी 13 पथके गठीत आहे. यामध्ये आठ महिला अधिकारी आणि 71 महिला अंमलदार आहे. हे पथक शाळा-कॉलेज अशा ठिकाणी भेटी देऊन प्रबोधन करतात. रोडरोमिओवर कारवाई हे पथक करीत असून आतापर्यंत 24 तक्रारींचे या पथकाने निवारण केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
          मुली व महिलांच्या आवश्यक त्यावेळी मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक 1091, 100 आणि क्रमांक 112 कार्यरत आहे.जिल्ह्यात 16 सप्टेंबर 2021 ते आजपर्यंत 466 कॉल प्राप्त झाले. त्यापैकी 110 कॉल महिलासंबंधी असून वेळोवेळी नमूद तक्रारींचे निवारण करून 24 मिनिटात महिलांना मदत उपलब्ध झाली. सायबर विभागामार्फत महिला व मुलींनी सोशल मीडियाचा वापर कसा करावा तसेच गुन्ह्यांपासून बचाव कसा करावा.याबाबतची माहिती या बैठकीत देण्यात आली. 
          जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून महिलांवर झालेल्या अत्याचाराला तात्काळ न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यात जलदगती न्यायालयांची स्थापना करण्यात येते. जेणेकरून महिला अत्याचाराचे गुन्ह्यांचे निकाल जलद गतीने लावून महिलांना न्याय मिळवून देण्यास मदत होते. जिल्ह्यात मागील सहा महिन्यात बलात्काराच्या एका गुन्ह्यात सात वर्ष दंडाची शिक्षा तसेच तीन गुन्ह्यात एक वर्ष दंडाची शिक्षा अशा एकूण चार गुन्ह्यात न्यायालयाने आरोपींना सुनावली आहे.
          पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी जिल्ह्यातील महिलांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी महिलांसाठी सर्व उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती श्री.बच्चन सिंह यांनी दिली. जिल्ह्यातील महिलांनी भयभीत न होता, हेल्पलाईन क्रमांक 100, 112 तसेच नियंत्रण कक्ष क्रमांक 7252- 234834 या फोनवर किंवा व्हाट्सअँप क्रमांक 8605878254 वर तक्रार करावी.तक्रार करणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश