शेतकऱ्यांनी डी.ए.पीचा हट्ट न धरता संयुक्त खतातून पिकास योग्य मात्रा द्यावी* कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनी डी.ए.पीचा हट्ट न धरता संयुक्त खतातून पिकास योग्य मात्रा द्यावी* 
            कृषी विभागाचे आवाहन

 वाशिम दि. 8 (जिमाका) मूग,उडीद व सोयाबीन या खरीप हंगामातील सलग क्षेत्रातील पिकाची काढणी पूर्ण झाली आहे.आता रब्बी पीक पेरणीची वेळ आली असून काही प्रमाणात हरभरा पिकांची पेरणी सुरू झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी रासायनिक खते जिल्ह्यात उपलब्ध आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा डी.ए.पी खताच्या वापराकडे दिसून येतो. त्यामुळे बाजारात डीएपीची मागणी वाढलेली दिसते. उपलब्ध संयुक्त खतातून सुद्धा पिकाच्या शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा देता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपी खताचा हट्ट न धरता संयुक्त खतातून पिकास योग्य मात्रा द्यावी. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
        बाजारात 10 : 26 : 26, 15 : 15 : 15 आणि 20 : 20 : 13 ही संयुक्त खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.तसेच सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश ही खते सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पेरणी करताना वरील संयुक्त खते द्यावीत.
          हरभरा पिकासाठी एकरी 10 किलो नत्र,20 किलो स्फुरद,12 पालाश देण्यासाठी 10 : 26 : 26 हे खत 75 किलो वापरल्यास एकरी 1765 रुपये किंवा 15 : 15 : 15 हे खत 50 किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 40 किलो वापरल्यास 2492 रुपये किंवा डीएपी 75 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो वापरल्यास 2320 रुपये खर्च येतो.    
       गहू कोरडवाहू 40 : 20 : 0 एकरी मात्रा देण्यासाठी 20 : 20 : 0 :13 100 किलो अधिक 50 किलो युरियामधून दिल्यास एकरी  2766 रुपये बागायती वेळेवर गहू पेरणीसाठी 40 : 20 : 20 ही मात्रा देण्यासाठी 10 : 26 : 26 हे खत 80 किलो अधिक युरिया 43 किलो वापरल्यास 2108 रुपये किंवा डीएपी 111 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 100 किलो अधिक युरिया 43 किलो वापरल्यास 4940 रुपये खर्च येतो.
           उशिरा पेरण्यात येणाऱ्या गव्हासाठी एकरी 32 :16 :16 नत्र स्फुरद व पालाश देण्यासाठी 15 : 15 : 15 हे खत 100 किलो अधिक युरिया 40 किलो दिल्यास 2813 रुपये किंवा डीएपी 35 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 80 किलो अधिक 35 किलो युरिया दिल्यास 2690 रुपये किंवा 20 : 20 : 0 : 13 हे खत 80 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 80 किलो अधिक 50 किलो युरियामधून 3850 रुपये खर्च येतो.यावरून डीएपी खताऐवजी इतर संयुक्त खते वापरल्यास खर्चात बचत होते आणि शिफारशीप्रमाणे मात्रा सुद्धा देता येते. तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात पिकासाठी डीएपी ऐवजी संयुक्त इतर खतांचा वापर करावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे