*विविध कायद्याविषयी लोक साक्षर व्हावेत* न्या. शैलजा सावंत *चिखली येथे महाविधी सेवा शिबीर*

*विविध कायद्याविषयी लोक साक्षर व्हावेत* 
                    न्या. शैलजा सावंत 

*चिखली येथे महाविधी सेवा शिबीर* 

वाशिम दि.12 (जिमाका) देशातील लोक मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात राहतात. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही लोकांना अनेक कायद्याची व योजनांची माहिती नाही.विविध योजनांची माहिती त्यांना झाली तर योजनांचा लाभ घेता येईल. तसेच विविध कायद्याबाबत माहिती जाणून घेऊन लोक कायद्याविषयी साक्षर व्हावेत. असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शैलजा सावंत यांनी केले.
           आज 12 नोव्हेंबर रोजी मंगरूळपीर तालुक्यातील चिखली येथील श्री. संत झोलेबाबा संस्थान सभागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत आयोजित महा विधीसेवा शिबिरात अध्यक्षस्थानावरुन न्या.श्रीमती सावंत बोलत होत्या. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संजय शिंदे, मंगरूळपीरचे दिवाणी न्यायाधीश एन.के.मेश्राम, उपविभागीय अधिकारी राम मुळे, तहसीलदार श्री.कोंढागुरले, तालुका विधी सेवा संघाचे अध्यक्ष ॲड.पी.आर.राठी यांची प्रमुख उपस्थिती होती.
          न्या. श्रीमती सावंत म्हणाल्या, आजादी का अमृत महोत्सवा निमित्ताने जिल्ह्यातील नागरिकांना महिलांविषयी,बालकांविषयी, कौटुंबिक हिंसाचार यासह अन्य कायद्याची माहिती व्हावी यासाठी विविध कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आली. विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.त्यामुळे नागरिकांना या शिबिरातून कायदेविषयक माहिती मिळण्यास मदत झाली.गरीब व्यक्तींना मोफत कायदेविषयक सेवा देण्याचे काम सातत्याने सुरू राहणार आहे. या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या स्टॉलच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
     न्या.शिंदे म्हणाले, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही समाजातील अनेक घटकांना न्याय मिळाला नाही.कारण त्यांना कायद्याची माहिती नाही. कायदेविषयक जनजागृती शिबिराच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळण्यास मदत होत आहे. त्यांच्या हक्क आणि अधिकारांची अंमलबजावणी झाली पाहिजे. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून गरिबांना मोफत कायदेविषयक माहिती देण्यात येते.न्याय सर्वांसाठी सारखा आहे. कोणीही न्याय हक्कांपासून वंचित राहू नये. त्याला कायद्याची माहिती मिळाली पाहिजे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात लोकांना कायद्याची आणि विविध योजनांची माहिती अशा शिबिरातून मिळण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
           प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते फीत कापून विविध विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.पाहुण्यांनी स्टॉलला भेट देऊन योजनांच्या घडीपुस्तिका पॉम्प्लेट्स, पुस्तिकांची माहिती जाणून घेतली.यावेळी आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग, इंडियन पेमेंट बँक, कृषी विभाग, भारतीय स्टेट बँक, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, पोलीस स्टेशन मंगरूळपीर व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमाला न्यायिक अधिकारी श्री. कुलकर्णी, श्री.मानकर, गटविकास अधिकारी श्री. परिहार, ऍड,एस एस ढेंगाळे,ऍड. हर्षद राठी,ऍड. संतोष सरकाडे, ऍड. प्रियदर्शन,ऍड.जोशी,ऍड.खान,ऍड.
मुळे,ऍड. नाकाडे, ऍड. पांडे, ऍड.प्रफुल भगत, ऍड.शृंगारे, ऍड.जोशी ऍड.खडसे,तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका,चिखली परिसरातील अनेक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक न्या. शिंदे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार ॲड श्रीमती वैरागडे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे