सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम यशस्वीपणे राबवा* सुनील निकम

सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम यशस्वीपणे राबवा*
                          सुनील निकम 

वाशिम दि.12(जिमाका) जिल्ह्यातील क्षयरोग निदानपासून अद्यापही वंचित असलेल्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी येत्या 15 ते 25 नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात येणारी सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावी. असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी दिले.
      राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातंर्गत 15 ते 25 नोव्हेंबर दरम्यान प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची सभा श्री.निकम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.सभेला समितीचे सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश आहेर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धर्मपाल खेडकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख, जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे डॉ. सतीश परभणकर,कुष्ठरोग कार्यालयाचे डॉ मिलिंद जाधव,क्षयरोग कार्यालयाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक एस.डी. लोनसुने व श्री.जैन यांची उपस्थिती होती.     
      श्री.निकम म्हणाले,जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेची माहिती पोहचली पाहिजे.त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सक्रीय संशयित रुग्णांचा शोध घेणे सोपे होईल.निदानापासून वंचित असलेल्या रुग्णांचे निदान झाल्यावर त्या रुग्णांवर वेळीच औषधोपचार करून अशा रुग्णांना या रोगातून मुक्त करता येणार आहे.या मोहिमेची व्यापक प्रसिद्धी झाली तर संशयित रुग्णांचा शोध घेण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 डॉ.आहेर म्हणाले, मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यामधुन प्रत्यक्ष संशयित रुग्ण शोधण्यास मदत होईल. त्यानंतर औषधोपचारातून रुग्ण क्षयमुक्त करता येईल. जिल्ह्यातील 8 ग्रामीण रुग्णालय, 25 प्राथमिक आरोग्य केंद्र, 152 उपकेंद्र आणि दोन शहरी आरोग्य केंद्राअंतर्गत क्षयरुग्णाचा शोध घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील 1 लाख 28 हजार 338 आणि शहरी भागातील 62 हजार 961 अशा एकूण 1 लाख 91 हजार 299 लोकसंख्येतून 250 चमुच्या माध्यमातून सक्रीय क्षयरुग्णाचा शोध घेण्यात येणार असल्याचे डॉ. आहेर यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे