पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी पुढे यावे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी पुढे यावे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

वाशिम, दि. 2 (जिमाका) : कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. कोरोना संसर्गापासून बचाव करायचा असेल तर लस घेणे हाच एकमात्र उपाय आहे. त्यामुळे ज्या पात्र व्यक्तींनी अद्याप एकही लस घेतली नाही, त्यांनी लसीकरणाबाबत गैरसमज करुन न घेता लसीकरणासाठी स्वत:हून पुढे यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.

आज 2 नोव्हेंबर रोजी तालुकास्तरीय यंत्रणांचा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाचा आढावा आयोजित सभेत श्री. षण्मुगराजन एस. यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, प्रभारी जिल्हा शल्यचिकीत्सक डी.व्ही. खेडकर यांची यावेळी उपस्थिती होती.

जिल्हयातील एकूण 13 लाख 74 हजार 735 लोकसंख्येपैकी लसीकरणासाठी 9 लाख 82 हजार 300 व्यक्ती पात्र आहे. त्यापैकी 1 नोव्हेंबरपर्यंत 5 लाख 82 हजार 751 व्यक्तींनी पहिला व 3 लाख 23 हजार 516 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत 9 लाख 6 हजार 267 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आल्याचे सांगून श्री. षण्मुगराजन पुढे म्हणाले, जिल्हयातील पात्र व्यक्तींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. आता सुट्टीच्या दिवशीसुध्दा लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस देण्यात येईल. पात्र व्यक्तींचे लसीकरण पुर्ण करण्यासाठी लसीकरण टीम वाढविण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या. 

ज्या गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशा गावांवर लक्ष केंद्रित करुन संबंधित गावातील पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यात यावे असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावे यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्यात यावे. डाटा एंट्रीची कामे पुर्ण करण्यात यावी. सध्या दिवाळीचा सण आहे. बाजारपेठांमध्ये नागरीक मोठया संख्येने खरेदीसाठी जातात, त्यामुळे गर्दीमध्ये आपणाला कोरोनाचा संसर्ग होणार नाही, यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीने कोविड लस घेवूनच बाजारपेठेत खरेदीला जावे. ज्यांनी अद्यापही लस घेतली नाही, त्यांना लस घेतलेल्या व्यक्तींनी लस घेण्यास प्रोत्साहित करावे. लोकप्रतिनिधींनी लसीकरण मोहिमेसाठी सहकार्य करावे. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.           
                                                                 *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे