स्वस्त धान्याचा लाभार्थ्यांना वेळेत व व्यवस्थीत पुरवठा व्हावा -जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. जिल्हा दक्षता समितीची सभा
स्वस्त धान्याचा लाभार्थ्यांना वेळेत व व्यवस्थीत पुरवठा व्हावा
-जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.
जिल्हा दक्षता
समितीची सभा
वाशिम, दि. 12 (जिमाका) : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्हयात विविध घटकातील लाभार्थ्यांना
स्वस्त धान्याचा पुरवठा करण्यात येतो. हे धान्य संबंधित लाभार्थ्यांना वेळेत व
व्यवस्थीत मिळाले पाहिजे. असे निर्देश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी दिले.
आज 12 ऑक्टोबर रोजी
जिल्हा दक्षता समितीची सभा वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली
आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला आ. राजेंद्र पाटणी, जिल्हा पुरवठा
अधिकारी संदिप महाजन, जिल्हा उपनिबंधक श्री. मैत्रवार, अकोला जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक श्री. सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. षन्मुगराजन म्हणाले,
रेशनकार्ड मागणीसाठी आलेल्या अर्जांचे स्वतंत्र रजिस्टर प्रत्येक तहसिल कार्यालयात
ठेवण्यात यावे. त्या अर्जामध्ये त्रृटी असेल तर तात्काळ संबंधिताला कळवून
त्रृटींची पुर्तता एका महिन्याच्या आत करुन घेवून नविन रेशनकार्ड लाभार्थ्याला
उपलब्ध करुन दयावे. पुरवठा विभागाने धान्य गोदामाची नियमित तपासणी करावी. धान्य
साठयाची व्यवस्थीत नोंद गोदाम किपरकडे असल्याची खात्री करावी. तालुकास्तरावरील सभा
नियमित घेण्यात याव्यात. धान्य गोदामात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे टप्याटप्याने
प्रशिक्षण घ्यावे. त्यांना नियमांची माहिती करुन दयावी. नियमानुसार गोदाम किपर
धान्य वितरणाची कार्यवाही योग्य प्रकारे करीत आहेत की नाही याकडे लक्ष दयावे. जर
संबंधित गोदाम किपर योग्य वितरण करत नसेल तर संबंधित गोदाम किपरवर कारवाई करावी.
असे त्यांनी सांगितले.
आ. पाटणी म्हणाले,
रेशनकार्ड वितरण व्यवस्थेत पारदर्शकता असली पाहिजे, स्वस्त धान्य दुकानदारांना
पुर्ण धान्य मिळाले पाहिजे. रेशनकार्डचा तुटवडा जाणार नाही, याबाबतची दक्षता
घ्यावी, असे ते म्हणाले.
श्री. महाजन माहिती
देतांना म्हणाले, जिल्हयात अंत्योदय योजनेचे 48 हजार 244, प्राधान्य कुटूंबाचे 1
लाख 77 हजार 940, एपीएल शेतकरी 23 हजार 676, एनपीएचमध्ये 16 हजार 512 आणि 9 हजार 552
शुभ्र रेशनकार्डधारक आहेत. जिल्हयात एकूण 2 लाख 49 हजार 860 कार्डधारक असून
लाभार्थी संख्या 10 लाख 85 हजार 632 आहे. सप्टेंबर महिन्यात ई-पॉस मशीनच्या
माध्यमातून 2 लाख 49 हजार 860 कार्डधारकांपैकी 2 लाख 35 हजार 295 कार्डधारकांना
धान्य वितरीत करण्यात आले. जिल्हयात सहा गोदाम असून त्याअंतर्गत एकूण 16 गोदाम
आहे. या गोदामाची क्षमता 12 हजार 720 मेट्रीक टन धान्य साठवणूकीची आहे. जिल्हयात
एकूण 776 स्वस्त धान्य दुकाने असून यामध्ये वैयक्तिक परवाने 631, माजी सैनिक 2,
महिला बचतगट 68, पुरुष बचतगट 4, ग्रामपंचायत 2, अनुसूचित जाती 26, अनुसूचित जमाती
23 आणि 20 सहकारी संस्थांच्या स्वस्त धान्य दुकानाचा समावेश असल्याचे त्यांनी
सांगितले. यावेळी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. वजीरे, पुरवठा अधिकारी श्री.
राठोड व श्रीमती सोळंके यांची उपस्थिती होती.
*******
Comments
Post a Comment