मिशन कवच कुंडल लसीकरण मोहिमेत जास्तीत जास्त पात्र व्यक्तीचे लसीकरण करा -जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. दुरदृष्य प्रणालीव्दारे तालुका यंत्रणांचा आढावा

 

मिशन कवच कुंडल लसीकरण मोहिमेत जास्तीत जास्त

पात्र व्यक्तीचे लसीकरण करा

-जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.

दुरदृष्य प्रणालीव्दारे तालुका यंत्रणांचा आढावा

वाशिम,दि. 07 (जिमाका) : कोरोनाचा संसर्ग कमी झाला तरी कोरोनाविषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी येत्या 9 ऑक्टोबरपासून जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या कवच कुंडल लसीकरण मोहिमेत जिल्हयातील नागरीकांना सहभागी करुन घेवून जास्तीत जास्त पात्र व्यक्तीचे लसीकरण करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी दिले.

आज 7 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी दुरद्ष्य प्रणालीव्दारे कवच कुंडल लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा तालुका यंत्रणेकडून आयोजित सभेत घेतला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे व महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

श्री. षन्मुगराजन म्हणाले, कोविड लसीकरण मोहिमेत वाशिम जिल्हा विभागात पहिला तर राज्यात 23 व्या क्रमाकांवर आहे. जिल्हयात सतत काही दिवस पाऊस असल्यामुळे सोयाबीनची कापणी होऊ शकली नाही. पाऊस थांबल्यामुळे आता सोयाबीन कापणीला वेग येत आहे. आगामी सण आणि सोयाबीन कापणी लक्षात घेता यंत्रणांनी लसीकरणाचे नियोजन करावे. कामानिमित्त बाहेर जिल्हयात स्थलांतरीत झालेले लोक सणानिमित्त पुन्हा गावाकडे येणार आहे, त्यांचे सुध्दा लसीकरण करण्यात यावे, असे ते म्हणाले.

ग्रामीण भागात शाळा सुरु झाल्यामुळे शाळांमध्ये लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा, असे सांगून श्री. षन्मुगराजन पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. त्यामुळे मोठया प्रमाणात लसीकरण होण्यास मदत होईल. ग्रामीण भागात जवळपास 13 ते 14 हजार कर्मचारी गावपातळीवर काम करतात. यामध्ये शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका व आशा वर्करचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे या मोहिमेदरम्यान उद्दिष्ट देवून जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण करावे. दररोज 15 हजारापेक्षा जास्त व्यक्तींचे लसीकरण करण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगीतले.

भविष्यात प्रत्येकांने पहिला डोस घेतला असावा असे सांगून, श्री. षन्मुगराजन म्हणाले, जास्तीत जास्त पात्र व्यक्तींना पहिला डोस देण्याचे सुक्ष्म नियोजन करावे. विविध यंत्रणांना सोबत घेवून लसीकरणाचे काम करण्यात यावे. ग्रामीण व शहरी भागात किती व्यक्तींचा पहिला डोस घेणे बाकी आहे ते शोधून त्यांना लसीकरण करण्याचे नियोजन करावे. मानोरा व मालेगांव तालुका यंत्रणांनी विशेष पुढाकार घेवून जास्तीत जास्त लसीकरणाचे नियोजन करावे. प्रत्येक गावाच्या लसीकरणासाठी सुक्ष्म नियोजन करावे. ग्रामपंचायती व संबंधित नगरपालिका व नगरपंचायत यांनी विशेष लक्ष देवून ही मोहिम यशस्वी करावी. बचतगटांच्या महिलांनासुध्दा या मोहिमेत सहभागी करुन घेतल्यास त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पात्र व्यक्तींचे लसीकरण करता येणार असल्याचे श्री. षन्मुगराजन म्हणाले.

डॉ. आहेर यांनी 9 ऑक्टोबरपासून कवच कुंडल या विशेष लसीकरण मोहिमेबाबतची माहिती दिली. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तींने लसीकरण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले. विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. लसीकरणासाठी सर्व धर्मगुरुंचा सहभाग आवश्यक आहे. सध्या 45 हजार लस उपलब्ध झाली असून लसीची कमतरता नसल्याचे डॉ. आहेर यांनी सांगीतले.

डॉ. राठोड म्हणाले, नागरी भागात सुध्दा जास्तीत जास्त पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी मनुष्यबळ कमी पडू देणार नाही. या मोहिमेदरम्यान जिल्हयात दररोज 20 हजार लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून तिसरी लाट आपण लसीकरणामुळे रोखू शकतो, असे ते म्हणाले.

श्री. तांगडे म्हणाले, शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यासाठी शाळांमध्ये लसीकरण शिबीरे आयोजित करण्यात येतील त्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण करण्यास मदत होईल.

श्री. नागपुरे म्हणाले, ग्रामीण भागात बचतगटांच्या महिलांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. यासाठी माविमच्या सहयोगींनी, समुदाय संघटक व्यक्ती व गावपातळीवरील बचतगटांच्या पदाधिकारी हे लस घेण्यासाठी पात्र व्यक्तींना प्रोत्साहित करण्याचे काम करतील, असे त्यांनी सांगीतले.

दुरदृष्य प्रणालीव्दारे या सभेत सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी  तसेच तालुकास्तरीय यंत्रणेचे अन्य अधिकारी सहभागी झाले.    

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश