गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस
गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा
-जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.
वाशिम दि.१२(जिमाका) सोनोग्राफीसारख्या तंत्राचा वापर आज गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी काही जण करीत असल्याचे दिसून येते. मुलींचा जन्मदर वाढविणे ही काळाची गरज आहे.जिल्ह्यातील कोणत्याही सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंगनिदान चाचणी होणार नाही, यासाठी सर्व सोनोग्राफी सेंटरने दक्षता घेऊन गर्भलिंगनिदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी दिले.
आज 12 ऑक्टोबर रोजी नियोजन भवनातील सभागृहात पी.सी.पी.एन.डी.टी आणि एम.टी.पी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमांतर्गत आयोजित सभेत श्री षण्मुगराजन बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. पुढे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे. किती महिला सोनोग्राफी करण्यासाठी येतात याची नोंद सोनोग्राफी सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या रजिस्टरमध्ये करण्यात यावी. सोनोग्राफी सेंटरची नियमित तपासणी करण्यात यावी.सोनोग्राफी सेंटरला जाऊन पती-पत्नी संबंधित डॉक्टरांना उत्सुकतेपोटी मुलगा आहे की मुलगी याबाबत विचारणा करतात का याबाबतची माहिती घ्यावी. गर्भपातासाठी काही महिला बाहेर जिल्ह्याच्या जातात का याकडे लक्ष द्यावे. बनावट प्रकरणात पकडलेल्या डॉक्टरांच्या मोबाइलमध्ये असलेल्या अनेक नंबरवर संपर्क साधून यापूर्वीसुद्धा असे अवैध गर्भपात डॉक्टरांनी केले आहे का याबाबतची खात्री करावी,असे त्यांनी सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड म्हणाले, जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी १९९४ च्या गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र वापर कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी बनावट डॉक्टरांची तक्रार करण्यास नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. आहेर म्हणाले, जिल्ह्यात वर्षभरात १८ हजार गर्भवती महिलांची नोंद होते. ५५ टक्के महिलांचे बाळंतपण हे खासगी हॉस्पिटलमध्ये तर उर्वरित महिलांचे शासकीय संस्थांमध्ये होते. बाळंतपण होणाऱ्या महिलांची माहिती गावातील आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविकांना असते, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून ऍड.राधा नरवलीया यांनी जिल्ह्यात एकूण ५७ सोनोग्राफी सेंटर असून एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत ३१ हजार ३६४ सोनोग्राफी करण्यात आल्याची माहिती दिली.
Comments
Post a Comment