22 ऑक्टोबरपासून जिल्हयातील चित्रपटगृहे सुरु होणार मार्गदर्शक सुचना जारी
22 ऑक्टोबरपासून जिल्हयातील चित्रपटगृहे
सुरु होणार
मार्गदर्शक
सुचना जारी
वाशिम,
दि. 20 (जिमाका) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य
शासनाने साथरोग कायदा- 1897 मधील तरतूदीची अंमलबजावणी 13 मार्च 2020 पासून लागू
केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत केले आहे.
कोविड विषाणूचे डेल्टा व डेल्टा प्लस व्हेरियंटचे विषाणू आढळून आले आहे. त्याचा
संसर्ग झपाटयाने होत असल्याने त्यास प्रतिबंध करण्याबाबत सुचना निर्गमित करण्यात
आल्या आहे. राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत चित्रपटगृहे पुन्हा नियंत्रित
स्वरुपात सुरु करण्यास मान्यता देऊन मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षन्मुगराजन एस.
यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करुन जिल्हयातील चित्रपटगृहे 22 ऑक्टोबरपासून
नियंत्रित स्वरुपात कोविड-19 बाबतच्या सर्व नियमांचे पालन करुन सुरु करण्यास सुधारीत आदेश पारित केले आहे. वाशिम
जिल्हयातील चित्रपटगृहे 22 ऑक्टोबर 2021 पासून नियंत्रित स्वरुपात सुरु राहतील.
कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी चित्रपटांच्या
प्रदर्शनादरम्यान सुनिश्चित करण्यात आलेल्या विशिष्ट उपाययोजना व्यतिरिक्त
स्विकारल्या जाणाऱ्या विविध सामान्य सावधगीरीच्या उपायांच्या दृष्टीने मानक
कार्यप्रणालीची रुपरेषा राहील. प्रतिबंधीत क्षेत्रातील चित्रपटगृहे/ मल्टीप्लेक्स
बंद राहतील. जिल्हयातील चित्रपटगृहे/ मल्टीप्लेक्स/ नाटयगृहे मालकांना/
व्यवस्थापकांना राज्य शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक
आहे.
चित्रपटांच्या
प्रदर्शनसंबंधी सर्वसाधारण मागदर्शक सुचना : सार्वजनिक आरोग्य
विभागाच्या उपाययोजनेनुसार कोविड-19 संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार
सर्व सुचनांचे पालन कर्मचारी व अभ्यागतांनी करणे आवश्यक आहे. चित्रपटगृहामध्ये
वेळोवेळी सभागृह, कॉमन एरिया आणि वेटिंग एरिया यामध्ये एकदम गर्दी होणार नाही याची
काळजी घेणे आवश्यक राहील. प्रत्येक व्यक्तीमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवणे आवश्यक
आहे. चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यास येणाऱ्या प्रेक्षकांनी मास्क लावणे बंधनकारक
राहील. चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकाकरीता प्रवेशव्दरावर, बाहेर पडण्याच्या दारावर व
परिसरामध्ये विनासंपर्क सॅनिटायझरची व्यवस्था करावी. चित्रपटगृह परिसरात कोविड-19
बाबतच्या सर्व नियमांचे पालन करावे. खोंकतांना आणि शिंकतांना टिशू पेपर/ रुमाल/
हाताच्या कोपऱ्याने तोंड आणि नाक झाकावे. आणि वापरलेल्या टिश्यू पेपरची व्यवस्थीत
विल्हेवाट लावावी.
सर्वांनी आरोग्याचे स्वत: निरीक्षण करणे आणि काही
लक्षणे आढळल्यास त्वरीत जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. चित्रपटगृह
परिसरात येणाऱ्या प्रेक्षकांना थुंकण्यास मनाई असेल. प्रेक्षकांना आरोग्याच्या
दृष्टीने आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे आवश्यक राहील. किंवा अंतिम कोविड लसीकरण
झाल्याबाबतचे प्रमाणपत्र दाखविणे आवश्यक राहील. चित्रपटगृह परिसरात फळ विक्रेते,
साफसफाई कर्मचारी व इतर सर्व कर्मचारी यांना कोविड-19 च्या लसीकरणाचे दोन्ही डोस
घेतलेले आवश्यक राहील. त्यापैकी दुसरा डोस घेतल्यापासून 14 दिवस पुर्ण झालेले
असावे. शॉपींग मॉल असलेल्या मल्टीप्लेक्स चित्रपट तिकीटाच्या विक्रीवर प्रवेश दिला
जाईल. जरी शॉपींग मॉलमध्ये प्रवेश पुर्णपणे प्रतिबंधीत ज्येष्ठ नागरीक व 18
वर्षापेक्षा कमी वयांच्या मुलांसाठी प्रतिबंधच असेल.
चित्रपटगृहामध्ये कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींना
प्रवेश राहील. चित्रपटगृह परिसरात व प्रवेशव्दारावर स्वच्छतेकरीता हँड सॅनिटायझरची
व्यवस्था करावी. चित्रपटगृह परिसरात प्रवेश करतांना व बाहेर पडतांना रांगेमध्ये
सुरक्षित अंतराकरीता चिन्हांकीत करण्यात यावे. चित्रपटगृहातून बाहेर पडतांना
रांगेत बाहेर पडतील. याबाबत योग्य नियोजन करावे. एक पडदा व अनेक पडदा असलेल्या
सिनेमागृहात मध्यंतरामध्ये गर्दी होणार नाही याचे नियोजन करुन वेगवेगळया वेळा
निश्चित कराव्यात. तसेच प्रेक्षक रांगेत व गर्दी न होता प्रवेश व बाहेर पडण्याचे
नियोजन करावे.
चित्रपट/ नाटयगृह व मल्टीप्लेक्समध्ये असलेल्या एका
आसन क्षमतेच्या 50 टक्के व्यक्तींना/ प्रेक्षकांना प्रवेश असेल. चित्रपटगृहे/
नाटयगृहे व मल्टीप्लेक्समध्ये आसन व्यवस्था अशा प्रकारे करण्यात यावी की ज्यामुळे
प्रत्येकांमध्ये शारिरीक आंतर राखले जाईल. चित्रपटगृह/ नाटयगृह व मल्टीप्लेक्सची
ऑफलाईन व ऑनलाईन तिकीट विक्री करतांना Not to be occupied निश्चित करुन विक्री
करावी. तसेच सदर सीट रिक्त ठेवावी. रिक्त ठेवतांना सदर सीटवर मार्कर पेनाने किंवा
स्टिकर लावून चिन्हांकीत करावी.
चित्रपटगृहाच्या पार्कींगमध्ये व परिसराच्या बाहेर
गर्दीचे योग्य व्यवस्थापन करुन शारिरीक आंतर राखले जाईल याची खात्री करावी.
लिफ्टमध्ये लोकांची संख्या मर्यादीत ठेवावी. तसेच शारिरीक अंतराबाबत नियमांचे पालन
करावे. मध्यांतरामध्ये परिसरात, लॉबी आणि स्वच्छतागृहामध्ये जास्त गर्दी
टाळण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे. सर्व प्रेक्षकांना गर्दी न करण्याबाबतचे
आवाहन करावे. मध्यांतराचा कालावधी वाढवून रांगेत मागे पुढे जाण्याचे आवाहन करावे.
चित्रपटगृह परिसरामध्ये तिकीट विक्री, फळे, अन्न
पदार्थ व इतर शीतपेय इत्यादीसाठी ऑनलाईन बुकिंग, ई-वॉलेटस व क्यू.आर. कोड स्कॅनरचा
वापर करावा. कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग सुलभ होण्यासाठी तिकीट बुकींगच्यावेळी संपर्क
क्रमांक घेण्यात यावा. बॉक्स ऑफिसवर तिकीटांची खरेदी दिवसभर खुली ठेवण्यात यावी.
विक्री काउंटरवर गर्दी टाळण्यासाठी आगाऊ बुकिंगला परवानगी देण्यात यावी. तिकीट
विक्रीच्या वेळेस गर्दी टाळण्यासाठी व शारिरीक अंतर पाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात
तिकीट काउंटर उघडण्यात यावे. रांगेमध्ये सुरक्षित, शारिरीक आंतर राखण्यासाठी
जमिनीवर विशिष्ट अंतरावर मार्किंग करावे.
संपुर्ण परिसराचे वारंवार स्वच्छता करुन संपर्कात
येणारी वस्तू जसे की, हँडल व रिलींग इत्यादीची स्वच्छता करण्यात यावी. प्रत्येक
शोनंतर स्वच्छता करावी. बॉक्स ऑफिस कार्यालय, अन्न, फळ विक्रेते व शीतपेय दुकाने,
कर्मचारी लॉकर्स, शौचालय आणि सार्वजनिक क्षेत्र यांची वारंवार स्वच्छता करुन
निर्जंतुकीकरण करावे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून स्वच्छता कर्मचाऱ्यांनी हात
मोजे, बुट, मास्क, पीपीई किट वापरावी. परिसरात कोणीही पॉजिटिव्ह आढळल्यास स्वच्छता
करुन निर्जंतुकीकरण करावे.
कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मास्क वापरावा, मास्कचा
स्टॉक पुरेशा प्रमाणात ठेवावा. वृध्द कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी,
वैद्यकीयदृष्टया सक्षम नसलेले कर्मचारी यांनी काळजी घेवून प्रत्यक्ष व्यक्तींच्या
संपर्कात येण्याचे टाळावे. सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने
मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन अद्यावत ठेवावा. सर्व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेबाबत
मार्गदर्शक व समन्वय ठेवावा. स्वत:च्या आरोग्याबाबत निरीक्षण करुन आजाराबाबत काही
लक्षणे असल्यास सुचना दयावी. सर्व कर्मचारी, फळ विक्रेते, सहायक कर्मचारी,
वापरकर्ते व घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सर्वांनी कोविड-19 लसीचे दोन्ही डोस
घेतलेले असावे. दुसरा डोस घेतल्यापासून 14 दिवस संपले असावे.
ऑनलाईन विक्री, डिजीटल तिकीट, लॉबी व वॉशरुमबाबत काय
करावे आणि काय करु नये याबाबत ठळक मुद्दे प्रसिध्द करावे. चित्रपट सुरु
होण्यापूर्वी, मध्यंतरानंतर ऑडिओ क्लिपव्दारे कोविड-19 बाबत घ्यावयाची खबरदारी,
मास्क घालणे, कोविड-19 विरुध्द लसीकरणाविषयी जागृती निर्माण करणे, हाताची स्वच्छता
राखणे तसेच परिसरात आणि बाहेर स्वच्छता ठेवणे याबाबत माहिती दयावी. कोरोना
जनजागृतीबाबत पोस्टर, बॅनर व ऑडिओ क्लिपचा वापर करावा. चित्रपटगृहात चित्रपट सुरु
होण्यापूर्वी व मध्यंतरात कोविड-19 बाबत जनजागृती व लसीकरणाबाबत आरोग्य विभाग व
स्थानिक प्रशासनाने तयार केलेली छोटी चित्रफीत प्रसारीत करावी.
एअर कंडिशनींग/ व्हेंटिलेशनसाठी केंद्र सरकारच्या
बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. चित्रपटगृहात वातानुकुलनचे
तापमान 24 ते 30 अंशापर्यंत असावे. 40 ते 70 टक्के आर्द्रता असावी. हवेचे पुन्हा
रि-सक्युलेशन शक्यतोवर टाळावेत. ताज्या हवेचे सेवन शक्यतोवर ठेवावे. शो सुरु
होण्यापूर्वी काही वेळ दरवाजे उघडे ठेवावी. क्रॉस व्हेटिलेशन पुरेशी असावी. उच्च
क्षमतेचे एक्झॉट फॅन स्वच्छतागृहामध्ये
लावावे.
कोविड-19 बाबत अपप्रचार व असभ्य वर्तनुकीबाबत प्रचार
रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून समन्वय साधावा. वेगवेगळया शोचे अंतर
एकाचवेळी येऊ नये याची खात्री करण्यासाठी चित्रपटगृहामध्ये वेळ दाखवावा.
प्रेक्षकांना अन्न व शीतपेय खरेदी करण्यासाठी सिनेमा ॲप/ क्यू.आर.कोड इत्यादी
वापरण्यास प्रोत्साहित करावे. अन्न व शीतपेयाची दुकाने अधिक प्रमाणात उपलब्ध करुन
दयावी. बंद पॉकीटातील खाद्य आणि शीतपेय विक्रीस परवानगी राहील. शारिरीक आंतर
राखण्यासाठी एका रांगेचा वापर करुन विशिष्ट अंतरावर जमिनीवर स्टिकर लावण्यात यावे.
स्क्रिनींग सभागृहात कोणतेही अन्न व शीतपेयास परवानगी राहणार नाही. खरेदी केलेले
अन्न व शीतपेय स्क्रिनींग सभागृहाच्या बाहेर परवानगी असेल. अन्न व शीतपेयाच्या
ठिकाणी गर्दी होणार नाही शारिरीक अंतर राखले जाईल याबाबतचे नियोजन व्यवस्थापकांनी
करावे.
चित्रपटगृह व्यवस्थापकांनी चित्रपटगृहे सुरु करतांना
कोविड-19 संदर्भातील केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्याही निर्बंधाचा भंग होणार
नाही याची दक्षता घ्यावी. मार्गदर्शक तत्वांचा भंग झाल्याचे आढळून आल्यास
संबंधिताविरुध्द कारवाई करण्यात येईल्. कोविड-19 च्या प्रार्दुभावास प्रतिबंध
करण्यासाठी निर्गमित केलेल्या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सुचना या प्रकरणीही लागू
राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास अशी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम
188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे माणण्यात येईल. संबंधित
व्यक्तीवर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना
यांच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम 188 अन्वये गुन्हे दाखल करण्यात येईल. हे आदेश
22 ऑक्टोबरपासून संपूर्ण वाशिम जिल्हयातील ग्रामीण आणि शहरी भागासाठी लागू राहील.
*******
Comments
Post a Comment