कोरोना लसीकरणातून गावे सुरक्षित करा - जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. वाशिम तालुका आढावा सभा
कोरोना लसीकरणातून गावे सुरक्षित करा
- जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.
वाशिम
तालुका आढावा सभा
वाशिम, दि. 22 (जिमाका) : कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला
असला तरी, तो पुर्णपणे गेलेला नाही. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केंव्हा येईल हे
सांगता येणार नाही. लस घेणे हाच एकमेव पर्याय कोरोनाला प्रतिबंध करण्यास पुरेसा
आहे. ग्रामीण भागातील सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण करुन गावे सुरक्षित करा. असे
आवाहन जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी केले.
आज 22 ऑक्टोबर रोजी
नियोजन भवनातील सभागृहात वाशिम तालुक्याचा लसीकरण आढावा आयोजित सभेत घेण्यात आला.
यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, निवासी
उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची यावेळी
प्रमुख उपस्थिती होती.
श्री. षन्मुगराजन
पुढे म्हणाले, गावपातळीवर आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, कृषी सहायक, तलाठी,
शिक्षक, ग्रामसेवक यांनी परस्परांशी योग्य समन्वय साधून गावातील सर्व पात्र
व्यक्तींचे 100 टक्के लसीकरण करावे. सोयाबीन कापणी बहुतांश प्रमाणात झाली आहे.
त्यामुळे कोणताही मजूर वर्गातील पात्र व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहणार नाही,
याबाबतची दक्षता घ्यावी. जिल्हयातील मजूर वर्ग कामानिमित्त बाहेर जिल्हयात असेल तर
त्यांच्याशी संपर्क साधून तेथील शासकीय आरोग्य संस्थेत जावून लसीकरण करण्यास
सांगावे. बाहेर जिल्हयात कामानिमित्त जाणाऱ्या मजूरांना लसीकरण करुनच पाठवावे.
दिवाळीनिमित्त गावाकडे परतणाऱ्या कामगारांचे लसीकरण करावे. लसीकरणासाठी प्रत्येक
गावात दवंडी देण्यात यावी. असे त्यांनी सांगितले.
गावपातळीवर घरोघरी
जावून सर्व्हेक्षण करण्यात यावे. किती व्यक्तींची लस घेणे बाकी आहे, याचा शोध
घेण्यात यावा असे सांगून श्री. षन्मुगराजन म्हणाले, पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाच्या
लाटेमुळे अनेकांना मोठया अडचणीला सामोरे जावे लागले. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट
केंव्हाही येवू शकते हे गृहीत धरुन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण करणे
अत्यंत महत्वाचे आहे. पात्र व्यक्तीचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी गावपातळीवर
नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे. संपुर्ण पात्र व्यक्तींचे लसीकरण झाले तरच जनजीवन
पुर्वपदावर येईल. तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, कृषी सहायक यांच्याकडे कामानिमित्त
येणाऱ्या व्यक्तीस लस घेतली का याबाबत विचारणा करावी. असे ते म्हणाले.
श्री. निकम पुढे
म्हणाले, ज्या व्यक्तींनी अद्यापही लस घेतली नाही, त्यांचे लसीकरणाबाबत गैरसमज
आहे. त्या व्यक्तींचे समुपदेशन करुन त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहीत करावे.
सर्व पात्र व्यक्तींच्या समन्वयातून आणि सहकार्यातून लसीकरण पुर्ण करावयाचे आहे.
प्रत्येक गावात 100 टक्के लसीकरण झाले पाहिजे, यासाठी गावपातळीवर कार्यरत
यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेवून योग्य समन्वयातून
सुक्ष्म नियोजन करुन सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण करावे. वृध्द आणि दिव्यांग
व्यक्तींचे त्यांच्या घरी जावून लसीकरण करावे. विरोध करणारे लोकसुध्दा समुपदेशन
केल्यानंतर लस घेतील. वाशिम तालुक्यातील खडसिंगी, वाई, कानडी, कामठवाडा, दुधखेडा
आणि तोंडगांव येथे 100 टक्के लसीकरण झाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून
माहिती देतांना डॉ. आहेर म्हणाले, 16 जानेवारीपासून जिल्हयात लसीकरणास सुरुवात
झाली. टप्प्याटप्प्याने पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. कोविशिल्ड आणि
कोव्हॅक्सीन या लसीचे डोस जिल्हयात देण्यात येत आहे. लसीकरण हाच एकमात्र कोरोना
प्रतिबंधासाठी उपाय आहे. दिवाळीनंतर तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लसीचे फायदे आहेत. लस घेतल्यानंतर बाधित व मृत्यू होण्याचे प्रमाण फारच नगण्य आहे.
लस घेतल्यानंतर बाधा होण्याची शक्यता कमी आहे. लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करुन
पात्र व्यक्तींचे लसीकरण करणे आवश्यक आहे. लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. लसीकरण
धडक मोहिम 19 ते 30 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सर्वच पात्र
व्यक्तींनी लसीकरण करावे. लसीकरण हे राष्ट्रीय कार्य आहे. यामध्ये सर्वांचा सहभाग
महत्वाचा आहे. वाशिम तालुक्यातील पाच प्राथमिक केंद्राअंतर्गत येणाऱ्या 121
गावातील 63 टक्के पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती डॉ. आहेर यांनी
यावेळी दिली.
आढावा सभेला
तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे पदाधिकारी, तहसिलदार श्री. साळवे,
गटविकास अधिकारी श्री, बदरखे, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,
पोलीस पाटील, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी गावपातळीवर आतापर्यंत
करण्यात आलेल्या लसीकरणाची माहिती ग्रामसेवक आणि तलाठी यांनी दिली. जास्तीत जास्त
लसीकरण करण्यासाठी सुचना काही उपस्थित लोकप्रतिनिधींनी यावेळी केल्या.
कार्यक्रमाचे संचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत यांनी केले. उपस्थितांचे
आभार डॉ. अविनाश आहेर यांनी मानले.
*******
Comments
Post a Comment