जिल्हाधिकाऱ्यांकडून अवैध बायोडिझेल विक्रीबाबतचा आढावा

 


                                                                    जिल्हाधिकाऱ्यांकडून

अवैध बायोडिझेल विक्रीबाबतचा आढावा

 

वाशिम, दि. 13 (जिमाका) : जिल्हयात काही ठिकाणी अवैध बायोडिझेल विक्री केंद्र सुरु आहे. या अवैध बायोडिझेल विक्रीबाबतचा आढावा जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात 12 ऑक्टोबर रोजी घेतला. श्री. षन्मुगराजन यावेळी म्हणाले, जिल्हयात काही ठिकाणी अवैध बायोडिझेल विक्री करण्यात येत आहे. बायोडिझेलचा वापर केवळ औद्योगिक क्षेत्रासाठी असतांना जिल्हयात सुरु असलेल्या केंद्रातून वाहनांसाठी इंधन म्हणून बायोडिझेलच्या विक्रीस प्रतिबंध करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी यावेळी उपस्थित सर्व तहसिलदारांना दिले.

सभेला जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप महाजन,सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. वजीरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सैय्यद, तहसिलदार सर्वश्री विजय साळवे, नीरज मांजरे, आशिष शेलार, रवि काळे, श्रीमती शारदा जाधव व श्री. कोंडागुरले, वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक के.एस. हनवते, पुरवठा विभागाचे व्हि.एन. राठोड, श्रीमती आर.के. सोळंके तसेच पेट्रोलियम असोशिएशनचे श्यामकुमार अग्रवाल, जितेंद्र छाबडा यांची उपस्थिती होती.

जिल्हयात कुठेही अवैध बायोडिझेलची विक्री वाहनासाठी इंधन म्हणून होत असेल तर त्याबाबतची माहिती दयावी, असे सांगून श्री. षन्मुगराजन म्हणाले, तहसिलदारांनी पेट्रोलियम व ऑईल कंपनीच्या प्रतिनिधींना सोबत घेवून अशा अवैध बायोडिझेल विक्री केंद्रावर नियमानूसार कारवाई करावी. यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सहकार्य करावे.

कोणत्या कायदयानुसार या बायोडिझेलची विक्री करण्यात येते, याबाबतची माहिती घ्यावी. राज्य शासनाने याबाबतचे नियम निश्चित केल्यावर अशा अवैध बायोडिझेल विक्रेत्यांवर नियमानूसार कारवाई करण्यात येईल. वाहनांसाठी ज्या इंधनाचा वापर होतो, तेच इंधन वाहनासाठी वापरण्यात यावे. सदर बायोडिझेल प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवून प्रयोगशाळेतून त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही व्यक्तीला थेट वाहनासाठी इंधन म्हणून बायोडिझेलची विक्री करता येणार नाही. नोंदणीशिवाय बायोडिझेलचे उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री करण्यास मनाई राहील. असे श्री. षन्मुगराजन यांनी सांगितले.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश