नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा -पालकमंत्री शंभूराज देसाई
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा
-पालकमंत्री शंभूराज देसाई
दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा सभा
वाशिम दि.२९ (जिमाका) जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून निधी मागणीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून देण्यात येणार्या मदतीचा निधी जिल्हा प्रशासनाला काही प्रमाणात वाटप करण्यात आला असून तो निधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात यावा.असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
आज २९ ऑक्टोबर रोजी दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्याचा आढावा घेताना श्री देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश आहेर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खेडकर जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आमरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री देसाई पुढे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे. विमा काढलेला नुकसानग्रस्त शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी प्रत्येक पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याचे नियोजन करावे. कोणताही पात्र व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे. सोयाबीन कापणीची कामे जवळपास आटोपली असून यंत्रणांनी लसीकरणावर लक्ष केंद्रित करावे. स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे १५ ऑगस्ट २०२२ रोजी उद्घाटन करण्याचे नियोजित असून या इमारतीच्या बांधकामाचा दर्जा उत्तम राहील व काम वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष देण्यात यावे.या केंद्राच्या बांधकामासाठी निधीची अडचण येऊ देणार नसल्याचे श्री. देसाई म्हणाले.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील याकडे पोलीस विभागाने लक्ष द्यावे असे सांगून श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात रिक्त असलेली उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची पदे पदोन्नतीतून लवकरच भरण्यात येतील. जिल्ह्यात पाणीसाठा वाढावा व त्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली यावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रत्येक तालुक्यात नादुरुस्त असलेली जलसंधारणाची प्रत्येकी पाच कामे हाती घेण्यात आली आहे. त्यापैकी १७ कामे सुरू असून उर्वरित कामे लवकर सुरू करून जास्तीत जास्त शेतीला सिंचनाची सुविधा निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन म्हणाले, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ३३ टक्क्यांवरील एकूण ७८ हजार ९५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी ४९ कोटी ४८ लाख ८१ हजार रुपये आवश्यक अनुदानापैकी ३१ कोटी ८९ लक्ष ८१ हजार रुपये निधी प्राप्त झाला असून तहसीलदारांना वितरित करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून लसीकरणापासून दूर असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणावर भर देण्यात आला आहे. १ लाख ३ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितच विम्याचा लाभ मिळेल.स्व.बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे बांधकाम गुणवत्तापूर्ण होईल याकडे आपले लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment