ईद-ए-मिलाद साजरा करण्याबाबत आदेश जारी

ईद-ए-मिलाद साजरा करण्याबाबत आदेश जारी
वाशिम,दि.१७(जिमाका) -कोविड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. १४ मार्च २०२० पासून साथरोग प्रतिबंध अधिनियम लागू करण्यात आला आहे. १९ किंवा २० ऑक्टोबर २०२१ रोजी ईद-ए-मिलाद साजरी करण्यात येणार आहे. कोविड -१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात ईद-ए-मिलाद साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी आदेश जारी केले आहे.
       ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध आहे. त्यामुळे ईद-ए-मिलाद शक्यतोवर घरात राहूनच साजरी करावी. मिरवणुका काढावयाच्या असल्यास पोलिस प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने एका मिरवणुकीत जास्तीत जास्त पाच ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीत जास्त पाच व्यक्तीस परवानगी देण्यात येईल. मिरवणुकीदरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करावे लागेल. मिरवणुका सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने ध्वनीक्षेपकाचाची व्यवस्था केल्यास ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. मिरवणुकीच्या स्वागतासाठी पेंडॉल बांधावयाचे असल्यास विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे आवश्यक राहिल.
         मिरवणुकीच्या रस्त्यावर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ लावण्यात येणाऱ्या पानपोई संदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. त्याठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तीनी उपस्थित राहू नये. तेथे सीलबंद पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात यावे. कोविड-१९ च्या परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबवून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.
     कोविड-१९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विहित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती,संस्था अथवा समूह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश