राज्यातील दुष्काळग्रस्त भागांत पशुधनासाठी #चारा आणि नागरिकांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा दुष्काळ उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
राज्यातील दुष्काळग्रस्त भागांत पशुधनासाठी #चारा आणि नागरिकांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा दुष्काळ उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. चारा खरेदी, लागवड, वाहतूक तसेच वीजजोडणीअभावी बंद असलेल्या नळपाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्यासाठी बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सुक्या चाऱ्यासाठी प्रतिकिलो १२ रुपये, तर हिरव्या चाऱ्यासाठी प्रतिकिलो ८ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. वन, महसूल, जलसंपदा आणि जलसंधारण विभागांच्या उपलब्ध शासकीय जमिनींवर चारा लागवडीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी दिला जाणार असून, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील अतिरिक्त चारा टंचाईग्रस्त भागांना पुरविण्यात येणार आहे.
वीजजोडणीअभावी बंद असलेल्या नळपाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासह थकीत वीजबिलांमुळे खंडित झालेल्या वीजजोडण्या पूर्ववत करण्यात येणार आहेत. राज्यातील ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित असून, पुणे, पालघर, रायगड व कोल्हापूर जिल्ह्यांतील अतिरिक्त भागांचा समावेश क्षेत्रीय पाहणी व अहवालानंतर निश्चित केला जाईल.
पाच हजार रुपयांच्या अग्रीम अनुदानासाठी पात्रतेचे निकष ठरविण्यात आले असून, आयकरदाते, शासकीय वेतनधारक अधिकारी-कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी अपात्र असतील. तलावांतील गाळ व मुरूम रस्त्यांच्या कामांसाठी वापरल्यास रॉयल्टीतून सूट, तलाव खोलीकरणासाठी मदत, शेतरस्ते व पाणंद रस्त्यांसाठी निधी आणि मत्स्यबीज उपलब्धतेसाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. तसेच, दुष्काळी उपाययोजनांचा लाभ आदिवासी व सामाजिक न्याय विभागाच्या पात्र लाभार्थ्यांनाही मिळणार आहे.
बैठकीस आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare
Comments
Post a Comment