स्पर्धा परिक्षेतील यशस्वीतेसाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही विलास सारसकर ग्रंथालये,स्पर्धा परिक्षा आणि आजचा युवक याविषयावर परिसंवाद “मी वाचन संस्कृती बोलतेय” एक पात्री नाटीकेने वेधले लक्ष !
स्पर्धा परिक्षेतील यशस्वीतेसाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही
विलास सारसकर
ग्रंथालये,स्पर्धा परिक्षा आणि आजचा युवक याविषयावर परिसंवाद
“मी वाचन संस्कृती बोलतेय” एक पात्री नाटीकेने वेधले लक्ष !
वाशिम,दि.०७ (जिमाका) सध्या जगाची वाटचाल ही स्पर्धात्मक आहे. सारं जग स्पर्धेने एकमेकांसोबत चाललेले आहे.प्रत्येक व्यक्ती प्रत्येकांशी स्पर्धा करण्यासाठी धजावलेला आहे.जणु स्पर्धा परीक्षा हाच त्यांचा जीवनाचा मार्ग आहे की काय असे वाटायला लागले आहे. स्पर्धा परीक्षा ही आजच्या काळाची गरज आहे असे म्हणणे वावगे ठरणार ठरणार नाही.कारण स्पर्धा केल्याशिवाय यश देखील मिळणार नाही.परंतु स्पर्धा करीत असतांना सामाजीक हिताचा देखील विचार करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे हे अंतिम ध्येय न मानता ते सामाजिक सेवेचे साधन मानले पाहिजे. असे तरूणमनावर बिंबविण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.असे प्रतिपादन विक्रीकर अधिकारी विलास सारसकर यांनी केले.
आज ७ जानेवारी रोजी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,वाशिम येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित वत्सगुल्म ग्रंथोत्सव - २०२२ च्या दुसऱ्या पर्वा प्रसंगी ग्रंथालये,स्पर्धा परिक्षा आणि आजचा युवक या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री.सारसकर बोलत होते.व्यासपिठावर अतिथी म्हणून धाबे करीअर अकॅडमी वाशिमचे संचालक प्रा.राहूल धाबे, अकोला जिल्हा बिज प्रमाणिकरण अधिकारी अभिजीत देवगीरकर, मेहकर तालुक्यातील हिवराश्रम येथील विवेकानंद विद्या मंदीर येथे कार्यरत असलेले भगवान राईतकर,जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री.धाबे म्हणाले, ग्रंथालय हा लॅटीन शब्द आहे. वाचनासाठी उपलब्ध असलेले निवास म्हणजेच वाचनालय होय.स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करतांना अचूक ध्येय ,वेळेचे नियोजन आणि संदर्भ ग्रंथ या तिनही बाबींचा योग्य ताळमेळ जमवला तर यश फार दूर नाही. स्पर्धा आणि परीक्षा या शब्दातुनच स्पर्धा परीक्षा ही संकल्पना बनलेली आहे. स्पर्धा परीक्षेबद्दल अज्ञान आणि भ्रामक दृष्टीकोनामुळे ही संकल्पना मनात आल्यानंतर अक्षरशा जीव घाबरून जातो.मनात असंख्य भितीचे वादळ भरून येतात.आत्मविश्वासाची कुठलीही खुनगाठ न बांधलेले मन भितीने ग्रासुन जाते. स्पर्धा आणि आपण ही संकल्पनाच बसेनाशी होते. स्पर्धा म्हणजे काय, तीचे स्वरूप कसे असते, त्यात कुठल्या स्वरूपाचे प्रश्न येतात,त्यासाठी अभ्यास कसा करावा लागतो, त्यासाठी व्यक्तीमत्व कसे घडवावे असे असंख्य प्रश्न मनात शिरकाव करतात.महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण पास होऊ शकतो काय,या भयशंकेनेच तो स्पर्धा परीक्षेपासुन दुर व्हायला लागतो. स्पर्धा परिक्षेसाठीचे योग्य वातावरण, मार्गदर्शन,परिस्थिती,वाटचाल,दिशा, अचूक ध्येय यांची सांगड घालणं गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा हाच आपल्या जीवनाचा राजमार्ग अशी संकल्पना प्रत्येक यूवक विद्यार्थ्यांच्या मनात बळावणे आवश्यक आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. देवगीरकर म्हणाले,ग्रंथांचं मंदीर म्हणजे वाचनालय होय. आजच्या युवकांनी स्पर्धा परिक्षा देतांना उत्कृष्ठतेची काय जोपासायला हवी. स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन स्विकारत असतांना असे म्हणावे लागते की स्पर्धा परीक्षा हा तरूण वर्गासाठी राजमार्ग आहे. नोक-या मिळविणे, उच्च पदावर जाणे, व त्या हस्तगत करून समाजसेवा करणे हे तरूणांसाठी फायदयाचे आहे व त्यांची अपार कष्ट करून ते मिळवावेच कारण स्पर्धा परीक्षा ही संधी आहे आणि विद्यार्थ्यानी ती मिळवीलीच पाहिजे.त्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे.अभ्यासानेच वाचन संस्कृती वृद्धींगत होते. ग्रंथालयामधुनच वाचनाला प्रेरणा मिळते.म्हणुनच माणसाने आजन्म अभ्यासक असावं.वाचनातुनच ज्ञानाच्या शाखा वृद्धींगत होतात व स्पर्धच्याही वाटा निर्माण होतात. म्हणुनच शालेय जीवनापासुनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास सुरू ठेवायला हवा.यावेळी त्यांनी ग्रंथालय संस्कृतीचा इतिहास सांगीतला.काही स्व-अनुभवाची सांगड घालत त्यांनी मार्गदर्शन केले.
श्री.राईतकर यांनी सध्या स्पर्धेचे युग आहे.ग्रामीण भागातील तरूण मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेेला बसतात.परंतु पुस्तक महागडी असल्याने त्यांना ती खरेदी करणे शक्य नसते.अशा वेळी ही पुस्तके गावातील ग्रंथालयात उपलब्ध करून दिली तर युवकांचा ओढा ग्रंथालयाकडे वळेल व त्याचा गरीब मुलांना फायदाही होईल ही संकल्पना पुढे ठेवून पुढच्या काळात दुसरा तरूण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला तर त्याला ग्रंथालयाचे महत्व कळेलच त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तो प्रयत्न करेल,अशी संकल्पना या ग्रंथोत्सावाची असल्याचे त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती महाविद्यालय आकोट येथील कु.आचल सरदार या विद्यार्थीनीने गीत गायन केले.तसेच कु.हर्षदा इंदाने या विद्यार्थीनीने " मी वाचन संस्कृती बोलतेय " ही एकपात्री नाटीका सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाला जिल्हयातील साहित्यीक,कवी,जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालयाचे संचालक, जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, पत्रकार तसेच नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सुभाषराव हातोलकर तर आभार प्रभाकरराव घुगे यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान श्री.राईतकर यांच्या आभाळाएवढी उंची ज्यांची या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
*******
Comments
Post a Comment