पदवीधर मतदारसंघ निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे श्री पंकजकुमार

पदवीधर मतदारसंघ निवडणूक 

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे 
                          श्री पंकजकुमार 

वाशिम दि.14 (जिमाका) येत्या 30 जानेवारी रोजी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे. असे निर्देश निवडणूक निरीक्षक श्री.पंकजकुमार यांनी दिले. 
         आज १४ जानेवारी रोजी श्री. पंकजकुमार यांनी निवडणूक तयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित सभेत घेतला.यावेळी ते बोलत होते.सभेला अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे,वाशिम उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनीलकुमार पुजारी,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसीलदार विजय साळवे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
         श्री पंकजकुमार म्हणाले, प्रत्येक मतदान केंद्रावर लाईटची व्यवस्था असावी.दिव्यांग मतदारांसाठी रॅमची देखील व्यवस्था करण्यात यावी. उमेदवारांच्या व मतदारांच्या तक्रारी येणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. उमेदवारांना निवडणूकविषयक ज्या परवानग्या द्यायच्या आहेत,त्या वेळेत देण्यात याव्या.कोणत्याही मतदान केंद्रावर मोबाईल नेटवर्कचा प्रश्न निर्माण होऊ नये.उमेदवारांच्या समाज माध्यम खात्यांवर सायबर सेलने बारकाईने लक्ष द्यावे.निवडणूक काळात अवैध दारू विक्री व वाहतूक होणार नाही यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आपली जबाबदारी पार पाडावी.आरटीओ कार्यालयाने जी वाहने निवडणूकीसाठी वापरण्यास योग्य आहेत,ती वाहने तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याची खात्री करावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवडणूकविषयक प्रशिक्षण महत्त्वाचे असून प्रशिक्षणादरम्यान बारकाईने सर्व बाबींची माहिती द्यावी.असे ते म्हणाले. 
          श्री महाजन यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली.पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील १८ हजार ५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.यामध्ये १३ हजार ३३३ पुरुष,४ हजार ७१५ स्त्री आणि २ इतर मतदार आहेत.मतदान केंद्रावर सॅनिटायझर आणि मास्कची व्यवस्था करण्यात येणार आहे.जिल्ह्यात एकूण २६ मतदान केंद्र असून जिल्हा ठिकाणापासून कामरगाव मतदान केंद्र हे सर्वात दूरचे मतदान केंद्र आहे.या निवडणुकीसाठी १५२ मनुष्यबळ लागणार आहे.यामध्ये सात झोनल ऑफिसर,३२ प्रीसायडिंग ऑफीसर, ९६ पोलिंग ऑफिसर आणि २ मायक्रो ऑब्झर्वरचा समावेश आहे.वैद्यकीय सेवेसाठी ७८ अधिकारी - कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येणार आहे. मतदान झाल्यानंतर सर्व मतपेट्या वाशीम येथे आल्यानंतर मतमोजणीसाठी अमरावतीला पाठविण्यासाठी अडीच तासाचा कालावधी लागणार असल्याचे श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.
        श्री पुजारी यांनी मतपत्रिका सुरक्षित ठेवण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात येणार असून मतपेट्या सुरक्षा कक्षासाठी ५ सशस्त्र सुरक्षा गार्ड तैनात राहतील. मतदान साहित्य वाटप व साहित्य स्वीकारणासाठी एक पोलीस हवालदार व दोन पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात येणार आहे.बंदोबस्ताकरिता २० पोलीस अधिकारी,९० पुरुष आणि २६ महिला असे एकूण ११६ अंमलदार यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती श्री. पुजारी यांनी यावेळी दिली.
        सभेला मोटार वाहन निरीक्षक श्रेयश सरागे,जिल्हा विशेष शाखेचे श्री.झळके व नायब तहसीलदार देवडे यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश