वाहतूक नियमाचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य शहाजी पवार 34 व्या रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचा शुभारंभ
वाहतूक नियमाचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य
शहाजी पवार
34 व्या रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचा शुभारंभ
वाशिम, दि. 13 (जिमाका) : सुरक्षितता हा जीवनाचा एक मार्ग आहे. रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. प्रत्येक नागरीकाने सुरक्षाविषयक नियमांचे पालन करणे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी केले.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज 13 जानेवारी रोजी 34 व्या रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान - 2023 चे उदघाटन श्री. पवार यांनी केले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, बालरोग तज्ञ डॉ. हरिष बाहेती, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे व सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सैय्यद यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री. पवार म्हणाले, अपघात झाला की, आपण सगळे हळहळतो, कधी कधी अपघात आपल्याच कोणाच्या तरी घरात मानसिक आघात पोहोचवितो. पण अपघात टाळायचा असेल तर वाहतूक सुरक्षिततेचा व रस्ता सुरक्षिततेचा विचार एक संस्कार म्हणून समाजात बिंबविणे गरजेचे आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्या असल्या तरी वाहन चालकांच्या चूकीमुळे अपघात होत असतात. रस्ता अपघात मृत्युचे प्रमाणात आपल्या राज्यात जास्त आहे. लहान मुलांना वाहन चालवायला दिले जाते. याबाबतीत पालकांनी सजग राहावे. रस्तेविषयक नियमांची माहिती शेवटच्या घटकापर्यंतच्या नागरीकांना व्हावी, या उद्देशाने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. शालेय अभ्यासक्रमात जर वाहतूकविषयक अभ्यासक्रमाचा समावेश झाला तर निश्चितच समाजाला याचा फायदा होऊन अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. असे ते यावेळी म्हणाले.
श्री. राऊत म्हणाले, वाहन चालकांनी वाहन चालवितांना घ्यावयाची दक्षता व अपघात घडू नये यासाठी संयम असणे गरजेचे आहे. प्रत्येकाने वाहतूकविषयक नियमांची माहिती करुन घ्यावी. वाहन यांत्रिकदृष्टया योग्य आहे की नाही हे तपासून घ्यावे. आपण समाजामध्ये राहातो. लोकांमध्ये वाहतूकीच्या नियमांची जनजागृती आणि प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
श्री. खडसे म्हणाले, जिल्हयात 34 व्या रस्ता सुरक्षा सप्ताह हा जरी सात दिवसाचा असला तरी याची अंमलबजावणी पूर्ण वर्षभर करावी. कोविड काळात आपल्याला कोरोनाने खूप काही शिकविले. कोविडपासून वाचण्यासाठी आपण जसा मास्कचा वापर केला तसा अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी दुचाकी चालवितांना हेल्मेट आणि चारचाकी वाहन चालवितांना शिटबेल्टचा वापर करावा. आपण समाजाचे काहीतरी देनं लागतो याची जाण ठेऊन एखादा अपघात झाला असल्यास त्या अपघातग्रस्तांची सुवर्णवेळ ओळखून आपण त्या अपघातग्रस्तांचा जीव वाचविला पाहिजे. प्रत्येक नागरीक जागरुक आणि जबाबदारपणे वागला तर अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. असे त्यांनी सांगितले.
डॉ. बाहेती म्हणाले, रस्त्यांवर वाढत जाणारी वाहनांची संख्या आणि होणारे अपघात या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर सार्वजनिक वाहन व्यवस्थेचे सक्षमिकरण, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि समाजाचे मानसिक परिवर्तन हया गोष्टी महत्वाच्या ठरतात. जिल्हयात अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी माणसे बचाव अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी त्यांनी मानसशास्त्र बाबींची माहिती दिली. गाडीचा वेग वाढवून अपघाताला निमंत्रण देत असतो. रस्ते सुरक्षाविषयक जनजागृतीसाठी आपण काय करु शकतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. अपघातात जर अपंगत्व आले तर जीवन जगणे कठीण जाते. रस्ता सुरक्षाविषयक नियमांची माहिती मुलांना सांगितली तर त्याचा प्रभाव जास्त होतो. असे ते म्हणाले.
श्री. हिरडे यांनी प्रास्ताविकातून 11 ते 17 जानेवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहाची माहिती दिली. नागरीकांना रस्तेविषयक नियमांची माहिती व्हावी, हा या सप्ताहाचा मुळ उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांवर होणारे अपघात ही सातत्याने होणारी घटना आहे. अपघातांची कारणे ही वेगवेगळी असू शकतात. अपघातात दरवर्षी मोठी वाढ होत आहे. अपघात कमी व्हावे, यासाठी परिवहन विभाग अहोरात्र काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर विविध शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हयात एकूण 315 अपघात झाले आहे. जिल्हयाच्या क्षेत्रफळाचा विचार करता झालेले अपघाताचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये मोटार सायकल अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. अपघातामधून आपण काही शिकत नाही. वाहन चालवितांना हेल्मेट आणि शिटबेल्ट वापर करण्याचा निर्धार प्रत्येकाने करावा. असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान वाहन सुरक्षाविषक नियमांच्या भिंतीपत्रिकाचे, घडीपुस्तिकेचे व माहिती पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मोटार ड्राईव्हींग स्कूलच्या वाहनांना रिफलेक्टर लावण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते रंगांचे फुगे आकाशात सोडण्यात आले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या इमारतीसमोर रस्ता सुरक्षेबाबतची आकर्षक रांगोळी साकारण्यात आली. यावेळी बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी सडक सुरक्षा जीवन रक्षा यावर आधारीत पथनाटय सादर केले. कार्यक्रमाला ड्राईव्हींग स्कुलचे संचालक, मोटार वाहन डिलर, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वरिष्ठ लिपीक श्याम बडेल यांनी केले. आभार मोटार वाहन निरीक्षक अनिल कदम यांनी मानले.
Comments
Post a Comment