खेळाडूंनी खेळाडूवृत्ती जोपासून खेळावे शहाजी पवार भूमि अभिलेख विभागीय क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धेचे उदघाटन
- Get link
- X
- Other Apps
खेळाडूंनी खेळाडूवृत्ती जोपासून खेळावे
भूमि अभिलेख विभागीय क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धेचे उदघाटन
वाशिम, दि. 12 (जिमाका) : खेळामुळे कामाचा ताणतणाव दूर होण्यास मदत होते. खेळामुळे आरोग्य निरोगी राहते आणि नेतृत्व गुणांचा विकास होतो. खेळाडूंनी पंचाचा निर्णय मान्य करुन खेळाडूवृत्ती जोपासून खेळावे. असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी केले.
आज जिल्हा क्रीडा संकुल येथे भूमि अभिलेख विभागीय क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धेचे उदघाटन श्री. पवार यांनी केले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अमरावती विभागाचे भूमि अभिलेख विभागाचे उपसंचालक विलास शिरोळकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खिरेकर, विदर्भ लँड रेकॉर्ड स्टाफ असोसिएशनचे अध्यक्ष गजानन इंगळे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष नितीन इंगोले, यवतमाळचे जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख शिवदास गुंड, बुलडाणाचे प्रभारी जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख विजयकुमार सवडतकर, वाशिमचे जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख शिवाजी भोसले व जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांची उपस्थिती होती.
श्री. पवार म्हणाले, क्रीडा महोत्सव हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. क्रीडा स्पर्धेतून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करावे. विभागीय स्पर्धेत जे चांगले खेळतील, ते राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील. 60 क्रीडा प्रकार या स्पर्धेत खेळले जाणार असल्यामुळे प्रत्येक खेळाडूंनी आपले क्रीडा कौशल्य दाखवावे असे ते म्हणाले.
श्री. शिरोळकर म्हणाले, वर्षभर अधिकारी व कर्मचारी आपआपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. कामादरम्यानचा ताणतणाव कमी व्हावा आणि विरंगुळा मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भूमि अभिलेख विभाग ड्रोन सर्व्हेक्षणात राज्यात प्रथम क्रमांकावर असून आगामी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतही अमरावती विभाग अव्वल ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री खिरेकर म्हणाले, कामाच्या तणावातून थोडा आनंद अशाप्रकारच्या क्रीडा स्पर्धेतून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळण्यास मदत होते. क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी कल्याण निधी उपलब्ध करुन देण्यात सुध्दा सातत्य असले पाहिजे. खेळाडूवृत्तीचे चांगले प्रदर्शन या क्रीडा स्पर्धेत दिसून यावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी क्रीडा स्पर्धेची ज्योत पानीपत (हरयाणा) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय केंद्रीय विद्यालय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी खेळात तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या वाशिम येथील भाविका देशमुख हिने प्रज्वलीत केली. सुरेश गोटे यांनी उपस्थित सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. स्पर्धेत सहभागी अमरावती विभागातील जिल्हयाच्या संघाचे सुरेश पथसंचलन खेळाडूंनी केले. पाहुण्यांच्या हस्ते आकाशात विविध रंगांचे फुगे सोडण्यात आले.
उदघाटन कार्यक्रम संपल्यानंतर पुरुष आणि महिलांच्या 100 मिटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. उदघाटन कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख शिवाजी भोसले यांनी केले. क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला अमरावती विभागातील भूमि अभिलेख विभागाचे खेळाडू अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार अमोल शिरसीकर यांनी मानले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment